Women sarpanchs should take up the initiative to prevent female foeticide: PM
Women sarpanchs must ensure that every girl child in their respective village goes to school: PM
Guided by the mantra of Beti Bachao, Beti Padhao, our Government is trying to bring about a positive change: PM
Boys and girls, both should get equal access to education. A discriminatory mindset cannot be accepted: PM
Swachh Bharat mission has virtually turned into a mass movement: PM Modi
Swachhata has to become our habit: PM Narendra Modi

देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेल्या आणि आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्तम पध्दतीने पार पाडणाऱ्या माझ्या माता भगिनींनो!

आज ८ मार्च, जागतिक महिला दिनाच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माता आणि भगिनींचे दर्शन घेण्याची, त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सौभाग्य समजतो.

मला असं सांगण्यात आलं की तुमच्यापैकी काही जणी तीन दिवसांपासून इथे आहात, कोणी दोन दिवसांपासून आहात. काही जणी दोन दिवसांनतर इथे थांबणार आहात. तुम्ही इथल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन आलात, इथली गावे कशी आहेत ते ही बघून आलात. इथेही तुम्ही सर्वानी प्रदर्शनही बघितले असेल. गावागावातला विकास आणि त्यात स्वच्छतेचे महत्व याचे आधुनिक पद्धतीचे अतिशय उत्तम प्रदर्शन इथे लागले आहे. मला इथे यायला जो उशीर झाला त्याचे कारण म्हणजे मी ते प्रदर्शन पाहण्यात अगदी गुंगून गेलो होतो. मी ते बघतच राहिलो, त्यामुळे उशीर झाला. इतके छान प्रदर्शन आहे. माझा आग्रह आहे की तुम्ही फक्त वरवर हे प्रदर्शन बघू नका, एका विद्यार्थ्याच्या नजरेतून लक्षपूर्वक ते बघा. कारण सरपंच या नात्याने तुम्ही जी जबाबदारी पार पाडता आहात, त्यात काम करण्यासाठी आपल्याला एक नवी दिशा मिळेल, माहिती मिळेल आणि आपल्या कामांविषयीचा संकल्प अधिक दृढ होईल, असा मला विश्वास आहे.

दुसरी गोष्ट, आजचा सोहळा स्वच्छ शक्तीचे संमेलन आहे. महात्मा गांधींची जन्मभूमी गुजरात आहे. गांधींच्या नावाने बनलेल्या शहरात आपण आज आहोत. आणि गांधी, ज्यांना आपण महात्मा म्हणतो, त्या महात्म्याच्या मंदिरात आपण आहोत, याचे किती महात्म्य आहे ते तुम्ही समजू शकता. इथेच महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित एक डिजिटल प्रदर्शनी आणि एक वस्तू संग्रहालयही आहे. इथेच गांधी कुटीर आहे, ते ही तुम्ही नक्की बघा. पूज्य बापूंच्या आयुष्याचा आणि विचारांचा अर्थ जर आपण समजून घेतला तर स्वच्छतेसाठीचा महात्मा गांधींचा आग्रही आपल्याला कळू शकेल आणि ते पूर्ण करण्यासाठी आपला संकल्प आणि परिणाम साधण्यासाठी आपले प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत.

२०१९ साली महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. महात्मा गांधी म्हणत असत की खरा भारत खेड्यामध्ये वसलेला आहे. दुसरी एक गोष्ट ते सांगत, की जर मला स्वातंत्र्य आणि स्वच्छता यापैकी एकाची निवड करायला सांगितली तर, मी स्वच्छतेची निवड करेन. गांधीजींच्या आयुष्यात स्वच्छतेचे किती महत्व होते हे त्यांच्या त्याविषयीच्या कटीबद्धतेतून आपल्याला कळते. २०१९ साली जेव्हा आपण महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करणार आहोत, त्यावेळी गांधीजींनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करणे ही आपली जबाबदारी नाही का? हा काही एका सरकारचा प्रयत्न नाही, गांधीजीच्या काळापासूनच ही मोहीम चालत आलेली आहे, आणि प्रत्येक सरकारने त्यात काही ना काही योगदान दिले आहे. मात्र आता आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्याला स्वच्छतेच्या क्षेत्रात अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. तसे मनात पक्के रुजवले तर स्वच्छता हा आपल्या स्वभावाचा एक नैसर्गिक भाग होऊन जाईल. आपली राष्ट्रीय ओळख बनेल, आपल्या वागण्या बोलण्यातून आचारातून लोकांना स्वच्छतेचा प्रत्यय येईल. आम्हाला अशी परिस्थिती निर्माण करायची आहे आणि आपला देश हे नक्कीच करू शकतो.

ह्या ज्या सरपंच भगिनी आहेत, त्यांनी हे आपल्या गावात करून दाखवले आहे. उघड्यावर शौचाला जाण्याविरुद्ध त्यांनी अतिशय मोठा संघर्ष केला आहे. गावात यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशी व्यवस्था विकासित करण्याचा संदेश यशस्वीपणे आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवला, त्या शक्तिरूपा आज आपल्यात बसल्या आहेत. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की जी गती आली आहे तीच गती कायम ठेवत अतिशय योजनाबद्ध आणि नियोजित कालावधीत आपण जर स्वच्छतेचे अभियान राबवले तर गांधीजींच्या १५० व्या जयंतीला आपण नक्कीच हे अभियान यशस्वीरीत्या पूर्ण करू शकू.

आपण आता एक चित्रपट पहिला, त्यात सांगितले आहे की स्वच्छतेच्या बाबतीत याआधी आपली क्रमवारी ४२ टक्के होती, आता इतक्या कमी कालावधीत ती ६२ टक्क्यांवर पोचली आहे. जर आपण इतक्या कमी काळात त्यात २० टक्के सुधारणा करू शकतो, तर येत्या दीड वर्षात आपण अधिक जोमाने काम करू शकतो. तुम्ही ते स्पष्टपणे करून दाखवले आहे.

ज्या माता आणि भगिनिंचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, त्यांच्या कामाविषयीचे एक एक मिनिटांचे छोटे माहितीपट आपण बघितले. काही लोकांचे जे भ्रम असतात, ते सगळे भ्रम दूर करणारे हे माहितीपट आहेत. काही लोकाना वाटतं की केवळ शिकली सावरलेली माणसेच काही काम करू शकतात, मात्र ती अचाट कामे या भगिनीनी करून दाखवली आहेत.

काही लोकांना वाटते की जे लोक शहरात राहतात, इंग्रजी बोलतात, तेच काही तरी कर्तृत्व गाजवू शकतात. मात्र ज्यांना आपल्या मातृभाषेशिवाय इतर कुठली भाषा येत नाही, असे लोकही हे काम करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला एका कामात झोकून दिले आणि तेच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले तर, तो ते लक्ष्य साध्य करतोच. अनेकांना तर त्यांच्या आयुष्याचे ध्येय माहितीही नसते. तुम्ही त्याना विचारलंत की उद्या काय करणार आहात? तर ते म्हणतात, संध्याकाळी सांगतो. अशी माणसे आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. आयुष्य केवळ वाया घालवतात, रोजचा दिवस कसातरी ढकलतात. कसेतरी आयुष्य काढायचे आणि जरा एकदोन चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा मोठा गाजावाजा करायचा अशी यांची तऱ्हा असते.

मात्र ज्यांना आयुष्याचे ध्येय सापडतं, म्हणजे, ‘आयुष्याचा हेतू’ सापडतो, तो न थकता, न कंटाळता, न झुकता आपल्या धेय्यपूर्तीसाठी झटत राहतो. त्यात ज्यांची गरज असेल त्यांना सोबत घेऊन, संघर्ष करायचा असेल तर त्याचीही तयारी ठेवत, आव्हानांचा सामना करत ते आपले ध्येय गाठतातच, तोपर्यंत ते काही शांत बसत नाही.

तुम्ही सगळ्याजणी सरपंच झाल्यात ही काही छोटी गोष्ट नाही. काही जणी असतील ज्यांना सरपंच बनण्यात त्रास झाला नसेल, मात्र अनेकजणी अशा असतील ज्यांना आजच्या लोकशाही परंपरेत या पदावर पोचण्यासाठी सुध्दा संघर्ष करावा लागला असेल, त्रास झाला असेल. साधारण पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा सरपंचांची मिटिंग व्हायची, त्यावेळीही महिलांना 33 टक्के आरक्षण होते. मात्र त्यावेळी मिटींगमध्ये वेगळाच अनुभव येत असे. त्यावेळी मी गुजरातच्या बाहेर काम करत होतो. अनेक राज्यांमध्ये मी काम केले आहे. तर त्यावेळी मिटींगमध्ये काही पुरुष असायचे. मी त्यांचा परिचय विचारला तर ते सांगायचे मी एस पी आहे. तर मला वाटायचे की सरकारी अधिकारी या मिटींगमध्ये काय करताहेत? ही तर पक्षाची सभा आहे. मी त्यांना विचारायचो की तुम्ही एस पी म्हणून कुठे काम करता? तर म्हणायचे नाही नाही, मी सरकारी अधिकारी नाही, एस पी म्हणजे ‘सरपंच पती’ आहे. मी विचारायचो, म्हणजे काय? तर सांगायचे की माझी बायको सरपंच आहे पण बैठकांना मीच जातो. एके काळी असेच होत असे. मात्र आज परिस्थिती तशी नाही. ज्या महिलेला सरपंच होण्याची संधी मिळाली, तिला वाटत की आज मला जी संधी मिळाली आहे, त्याचे मी सोने करेन. काहीतरी कामे नक्कीच करेन. ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ही कामे करते. कुटुंबातही या बदलाला स्वीकारलं जाईल, असे प्रयत्न करते. आणि अनुभव असा सांगतो की पुरुष सरपंचांपेक्षा महिला सरपंच आपल्या कामाप्रती अधिक समर्पित असते. त्यांचे त्यांच्या कामाकडे पूर्ण लक्ष असते.पुरुष सरपंच एकाचवेळी इतर पन्नास गोष्टी करत असतो. तो सरपंच झाला की त्याला जिल्हापरिषदेत जाण्याचे वेध लागतात. जिल्हापरिषदेत गेला तर त्याच्या पुढच्या पदावर जाण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. मात्र याउलट महिलांना एक जबाबदारी दिली तर त्या पूर्ण निष्ठा आणि तन्मयतेने ती पार पाडण्यासाठी कष्ट करतात. आणि त्याचेच परिणाम आज आपल्याला दिसताहेत.

एका संस्थेने खूप रोचक सर्वेक्षण केले आहे आणि या सर्वेक्षणात अतिशय महत्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. यात ज्या व्यावसायिक महिला आहेत, त्यांचे सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणानुसार, नव्या गोष्टी शिकण्याची महिलांची जास्त तयारी असते. जे काम तिला सोपवले आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपली जितकी क्षमता वापरता येईल, तेवढी क्षमता त्या वापरतात. काम पूर्ण होईपर्यंत त्या स्वस्थ बसत नाही. त्या सतत त्याचा पाठपुरावा करत राहतात. आपले काम पूर्ण करण्यासाठी, जे निश्चित केले आहे ते साध्य करण्यासाठी काय काय साधने वापरता येतील, कोणाकोणाला सोबत घ्यायला हवे, हे सगळे त्या विचारपूर्वक करतात. आपला अहं कधीही कामाच्या आड येऊ देत नाहीत. कोणाला नमस्कार करून काम करवून घ्यायचे असेल तर तेही करतात, कोणाला रागावून सांगायचे असेल तर तसे सांगतात. खूपच रोचक सर्वेक्षण आहे हे!

आपल्या देशातली ही ५० टक्के मातृशक्ती जर भारताच्या विकास यात्रेत सक्रीय सहभागी झाली तर आपण देशाला कुठच्या कुठे पोचवू शकतो. आणि म्हणूनच, “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हा मंत्र घेऊन त्या दिशेने अद्याप खूप काम करण्याची गरज आहे. कमीतकमी ज्या गावाच्या सरपंच महिला आहेत अशा गावात तरी स्त्रीला गर्भातच मारून टाकण्याचे पाप होऊ नये. आणि जर एखाद्या सरपंच भगिनीने हा निश्चय केला तर त्या नक्कीच हे काम करू शकतील. कौटुंबिक दबावामुळे जरा एखाद्या सुनेचा छळ होत असेल, तर महिला सरपंच अशा पीडितेची रक्षक बनून उभी राहू शकते. आणि जर एकदा तिने पुढाकार घेतला तर कोणीच काही करू शकणार नाही. बेटी बचाओ! आज समाजात, आयुष्यात कशी दुर्दशा आली आहे! १००० मुलांच्या प्रमाणात कुठे ८०० तर कुठे ८५०, कुठे ९०० कुठे ९२५ अशा मुली असल्याची आकडेवारी आहे. जर समाजात असे असंतुलन निर्माण झाले तर हे समाजाचे चक्र चालणार कसे? आणि हे पाप आहे, ते पूर्ण थांबवणे आपली जबाबदारी आहे.

सरपंच महिला कदाचित या कामात जास्त यशस्वी होऊ शकतील. समाजाची जी मानसिकता आहे, की मुलगी झाली, आता काय, ती तर दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, मुलगा तर आपल्या वंशाचा आहे! त्याला सांभाळले पाहिजे. एक आई, ती पण तर स्त्रीच असते! पण तुम्ही पहिले असेल लहानपणी, जेव्हा आई जेवायला वाढते तेव्हा तूप वाढत असेल तर मुलाला एका चमचा जास्त वाढते. मुलीला एक चमचाच वाढते. का? तर मुलीला दुसऱ्या घरी जायचे आहे! मुलाला मात्र खुष ठेवायचे. मात्र, मुलेच आपली जबाबदारी घेतात, ही गोष्ट अजिबात खरी नाही. मी अशा अनेक मुली पहिल्या आहेत, ज्या आपल्या आईबाबांचे एकटे अपत्य आहे, तर आपल्या माता पित्याला वृद्धापकाळी कष्ट होऊ नये, म्हून त्या लग्न करत नाही. काम करतात, मेहनत करतात आणि आपल्या आई वडलांचे कल्याण करतात. आणि मी अशेही घरे पहिली आहेत, जिथे चार चार मुले आहेत, पण आई वडील वृद्धाश्रमात आयुष्य घालवत आहेत. अशी मुले देखील मी पहिली आहेत.

आणि म्हणूनच, भेदभाव करण्याची जी मानसिकता समाजात आहे, त्या मानसिकतेविषयी आपण दृढ संकल्प करत समाज बदलण्याची गरज आहे. बदल होतो आहे, असे नाही की समाज बदलत नाहीये. तुम्ही बघा, यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची निशाण कोणी फडकवले? त्या सगळ्या माझ्या देशाच्या कन्याच आहेत! त्यांनी देशाची मान उंचावली, दहावी बारावीचे निकाल बघा. पहिल्या दहा क्रमांकावर मुलीच असतात. मुलांना तर शोधावे लागते की आपला नंबर लागला आहे का? मुलींनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.

जिथे त्यांना जी संधी मिळाली, ते कार्य नेत्रदीपक करून दाखवण्याचे काम आपल्या माता-भगिनीनी केले आहे, आणि म्हणूनच आपला नारा आहे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. माणूस म्हणून जबाबदारी आहे. अशा अमानुष गोष्टी समाज कधीही स्वीकारणार नाही. आपल्या शास्त्रात मुलीचे महात्म्य वर्णन करताना म्हटले आहे की,

यावत गंगा कुरूक्षेत्रे, यावत तिष्‍ठति मेदनी।

यावत सीता कथालोके, तावत जिवेतु बालिका।।

जोपर्यंत गंगा, कुरुक्षेत्र आणि हिमालय आहे, जोपर्यंत सीतेची गाथा या जगात आहे, तोपर्यंत बालिके तू जिवंत रहा. तुझे नाव तोपर्यंत हे जग लक्षात ठेवेल. हे आपल्या शास्त्रामध्ये मुलींसाठी सांगितले गेले आहे. म्हणूनच मुलींना वाचावा आणि त्यांना खूप शिकवा! कसलाही भेदभाव करू नका.

आपल्या सरपंच महिलांना आमचा आग्रह आहे की तुम्ही तुमच्या गावात जाऊन या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्या. जर मुलगे शिकत असतील तर गावातल्या मुलींनी शिकायला हवे. गरीबाहून गरीब घरातली मुलगीही शिकलीच पाहिजे. आणि सरपंचांनी हा विचार करू नये की यासाठी वेगळा निधी लागेल, निधीची आवश्यकता नाही. सरकारने शाळा सुरु केल्या आहेत, त्या शाळांमध्ये शिक्षक नेमले आहेत. तुम्हाला फक्त यावर देखरेख ठेवायची आहे की या मुली नियमित शाळेत जातात की नाही? कुठले कुटुंब आपल्या मुलीना शाळेत पाठवत नाहीये त्यावर नजर ठेवा आणि अशा कुटुंबाना भेट देऊन त्यांची समजूत काढा.

आपण सरपंच आहात. एक काम करा, तुम्हालाही ते काम आवडेल. शाळेतल्या मुलांना सांगा की त्यांनी आपल्या गावातल्या सरपंचाचे नाव लिहावे. आपल्याच गावच्या, दुसऱ्या गावच्या नाही. आपल्या गावचे सरपंच आहेत. साधारण दोन वर्षांपासून असतील, तीन वर्षांपासून असतील. पण आपल्या गावातील शाळेचा विद्यार्थ्याला आपले नाव माहित नसेल, की तो ज्या गावात राहतो, तिथले सरपंच कोण आहेत. त्याला हे माहित असेल की पंतप्रधान कोण आहेत, त्याला हे माहित असेल की मुख्यमंत्री कोण आहेत, पण त्याला आपल्याच गावाचे सरपंच कोण आहेत हे माहित नसेल. आणि ज्याला माहित असेल त्याला सांगा की नाव लिही. मग आपल्या लक्षात येईल की ज्या गावाचे तुम्ही सरपंच आहात, ज्या गावात आपल्या गावात शाळा आहे, शिक्षकांना पगार दिला जातो, हजारो लाखो रुपये खर्च करून शाळेची इमारत बांधली आहे, आणि त्याच गावातील मुलांना आपले नाव देखील लिहिता येत नाही. याचं आपल्याला दुःख व्हायला पाहिजे की नाही? आपण गावात जाऊन हा प्रयोग करून बघा. तुम्हाला बघून ते सांगतील की हे आमचे सरपंच आहेत, पण नाव मानीत नसेल.

मी हे म्हणत नाही की तुम्ही आपल्या गावाची पूर्ण सेवा करता की करत नाही. महिन्यातून एखाद वेळेस गावातील सगळ्या शिक्षकांना आपल्या घरी चहा प्यायला बोलवा. त्यांना सांगा की बघा, मी ह्या गावाची सरपंच आहे. माझी इच्छा आहे की आपली मुले कुठेच कमी पडता कामा नये. त्यांचा तालुक्यात नंबर आला पाहिजे, जिल्ह्यात नंबर आला पाहिजे, राज्यात नंबर यायला हवा. सांगा, मग तुम्हाला काही त्रास आहे का? वर्षातून चार महिने तर शाळांना सुट्टीच असते. ७-८ महिनेच तुम्हाला त्याना बोलवावे लागेल. त्यात एखादा दिवाळीचा दिवस असेल, एखादा होळीचा सण असेल, इतर कुठला सण असेल, असे तर फक्त दोनदाच बोलवावे लागेल. मात्र त्या शिक्षक शिक्षिकांना लक्षात येईल की गावातल्या सरपंच खूप सक्रीय आहेत. गावातल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे याची त्यांना काळजी आहे. मात्र आपल्याला चित्र असे दिसते की जास्तीत जास्त सरपंच इतर पन्नास कामे करतील, पण ज्या मूलभूत गोष्टी आहेत,त्यांच्याकडे लक्ष देणार नाहीत. पूर्वी तर अशी स्थिती होती की सरपंच गावाचा प्रमुख राहत असे. का? तर गावात कोणीही पाहुणे आले तर त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व्यवस्था सरपंच करायचे. आज १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर तर दोन लाख रुपयांची रक्कम थेट गावांमध्ये जाते. दोन लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही.

तुम्ही गावांनी मिळून जर असे ठरवले की येत्या ५ वर्षात मला ही २५ कामे पूर्ण करायची आहेत, तर आपण ती सहजपणे करू शकतो, यशस्वीरीत्या पार पाडू शकतो. कधी गावातल्या अंगणवाडी कार्यकर्त्याना घरी बोलवा, तर कधी तुम्ही स्वतः तिथे भेट द्या. तिथे स्वच्छता ठेवली जाते की नाही, शिक्षिका चांगल्या आहेत नं? मुलांना आहार नियमितपणे वेळच्या वेळी मिळतो आहे की नाही, मुलांना जे खेळायचे असेल ते खेळू देतात की नाही? या सगळ्या गोष्टीकडे जरा लक्ष द्या. तुम्ही गावाला नेतृत्व द्यायला हवे.

तुम्हाला माहीत असेल की सरकार लसीकरणावर निधी खर्च करते, आणि मी आता तुम्हाला जी जबाबदारी देणार आहे, त्यासाठी वेगळ्या निधीची गरज नाही. तुम्हाला किंवा तुमच्या गावाला एका पैसाही खर्च करायला नको. आपण कधी हा विचार केला का, की आपल्या गावातल्या ५० मुलांचं लसीकरण व्हायला पाहिजे होतं, पण फक्त ४० मुलांचं झालं, १० मुलांचं का नाही झालं? ते कसं करवून घेणार? गावचे सरपंच म्हणून जर आपण जातीने लक्ष घालून, सर्व मुलांचे लसीकरण करवून घ्याल, जितक्या लसी द्यायच्या आहेत त्या सर्व दिल्या गेल्या तर मुलांना गंभीर आजार होतील का? तुमच्या गावातील प्रत्येक मुलाचे लसीकरण झाले, तुमच्या कार्यकाळात जी मुले लहान असतील ती पूर्णतः निरोगी राहतील, त्यांना कुठलाच आजार होण्याची शक्यता नसेल तर जेव्हा ती मुले २० वर्षांची होतील, २५ वर्षांची होतील तेंव्हा तुम्हाला किती अभिमान वाटेल की गावातील सगळे युवक निरोगी आणि सुधृढ आहेत. मला सांगा, म्हातारपणी तुमच्या जीवनात किती आनंद मिळेल.

पण लसीकरण करायला लोक आले आहेत. बरं, बरं आपण काही खाल्लं प्यायलं की नाही, चहा घेतला, ठीक आहे ठीक आहे, करा लसीकरण. नाही, मी सरपंच आहे, माझ्या गावात कुणीही लसीकरणाशिवाय राहता कामा नये. मी सरपंच आहे, माझ्या गावात एकाही मुलगी शाळेत जाण्यापासून वंचित राहणार नाही. मी सरपंच आहे, माझ्या गावात एकाही मुलगा शाळेतून पळून घरी जाणार नाही. मी सरपंच आहे, माझ्या गावातल्या शाळेत सर्व शिक्षक येतात की नाहे, ह्यावर मी पूर्ण लक्ष ठेवीन.

हे काम जर, नेतृत्व आमच्या सरपंचां कडून करून घेतलं, कुठल्याही खर्चाविना, कुठलेच पैसे खर्च होणार नाहीत, नव्याने पैसे लावायचे नाही, सरकारी योजना लागू केल्याने फार मोठा फायदा होणार आहे. कधी कधी आपण विचार केला असेल आजाराचं कारण खेड्यात आहे.

आता आपण बघतोय अलीकडे आपलं लक्ष आता शौचालयांकडे जात आहे. पण स्वच्छतेमुळे किती आर्थिक बचत होते, हा विचार केला कधी केला का? जागतिक बँकेच्या अहवालानुसार अस्वच्छतेमुळे गरीब कुटुंबात जे आजार होतात त्यावर वर्षाला सरासरी ७ हजार रुपये खर्च होतात. जर आपण गावात स्वच्छता ठेवली, गावात रोग राई पसरणार नाही याची दक्षता घेतली तर, गरीबांचा वार्षिक ७ हजार रुपयांचा खर्च वाचेल, की नाही वाचणार? ह्याच पैशातून ती गरीब व्यक्ती मुलांना दुध पाजेल की नाही पाजणार? ती सुदृढ मुले आपल्या गावाची शोभा वाढवणार की नाही वाढवणार? आणि म्हणून, मी गावाचा सरपंच असताना, माझ्या कार्यकाळात, गावाचा प्रमुख म्हणून माझ्या गावात ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मी ह्यावर अजिबात तडजोड करणार नाही, ह्या दृढ विश्वासाने आपल्याला काम करावे लागेल.

आपल्या देशात खेड्यांचं महत्व अनेक मोठ्या व्यक्तींनी मान्य केलं आहे. पण रवींद्रनाथ टागोरांनी १९२४ मध्ये शहर आणि खेडी ह्यावर कविता केल्या आहेत, बंगाली भाषेत लिहिल्या आहेत. पण मी त्याचा थोडा हिंदी अनुवाद आपल्याला सांगतो. आपल्याला वाटेल की ही कविता आपल्यावर तंतोतंत लागू पडते. पण ही १९२४ मध्ये लिहिली आहे. त्यांनी लिहिलं होतं – आणि हे महिला वर्ष आहे, त्यामुळे तर अगदी समर्पक आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं होतं –

“खेडं महिलांसारखं असतं. म्हणजे जसं खेडं, तशा तिथल्या महिला तसं ते खेडं असतं, त्यांच्या अस्तित्वानेच समस्त मानव जातीचं कल्याण दडलं असतं, स्त्रीच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतं. शहरांच्या तुलनेत, खेडी निसर्गाच्या अधिक जवळ आहेत आणि जीवनाशी अधिक जोडलेले आहेत. खेड्यातील लोकांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती असते, जी कुठली ही जखम भरू शकतात. महिलांप्रमाणेच, खेडी देखील मनुष्याच्या भूक, आनंद यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण करतात, जीवनाच्या एका कवितेप्रमाणे. त्याच प्रमाणे, खेड्यात जन्माला येणारी महिला, तिथल्या सुंदर परंपरांप्रमाणे गावात आनंद पसरवितात, पण जर महिलांचे शोषण झाले, गावातील स्रोतांचे शोषण झाले, तर सगळा आनंद हर्षोल्हास संपतो.”

आपण देखील विचार केला असेल की गावातील स्रोतांचे शोषण झाले पाहिजे का? निसर्गाचे रक्षण केले पाहिजे की नाही? वृक्षवल्ली, हिरवळ, पाणी, शुद्ध हवा यासाठी असं एखादं खेडं का तयार करू नये की शहरात राहणाऱ्या लोकांना पण तिथे एक छोटं घर बांधण्याची इच्छा होईल. आणि आठवड्यातून एक दोन दिवस तिथे येऊन राहण्याची इच्छा होईल, असं एखादं खेडं आपण का तयार करू नये. हे होऊ शकतं. आजकाल अशी पद्धत आहे, जरी खेड्यात राहत असलो तरी, शहरात एक छोटं का होईना, घर असावं असं सगळ्यांना वाटतं. सुट्टीच्या दिवशी, मुलांना घेऊन जायला. अशी देखील पद्धत सुरु होईल की असं एखादं खेडं असावं जिथे कुटुंब आणि मित्रांसोबत जाऊन वेळ घालवता येईल. असं गाव बनवलं जाऊ शकतं.

रूरबन मिशन हा सरकारचा असाच एक प्रयत्न आहे. गाभा तर गावाचा असावा, पण सुविधा शहराच्या उपलब्ध असाव्या. देशातील प्रत्येक ग्रामपंचायत ऑप्टीकल फायबर नेटवर्क ने जोडण्याचं काम सुरु आहे. देशात अडीच लाख ग्रामपंचायती आहेत. जवळ जवळ ७० हजार ग्रामपंचायती ह्या नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. शाळेत आणि ग्रामपंचायत कार्यालयात ह्या केबल्स लागतील. गावाच्या गरजेनुसार तिथे ह्या नेटवर्कचा विस्तार केला जाईल. गावांना देखील आधुनिक बनविण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अलीकडे गावांमध्ये देखील, मी जेंव्हा आत्ता प्रदर्शन बघत होतो, तेंव्हा सचिव महोदय मला सांगत होते की ज्या सरपंच भगिनी आल्या आहेत, त्या मन लाऊन हे प्रदर्शन बघत होत्या आणि म्हणाले के सगळ्या सेल्फी घेत होत्या. कधी कधी आम्ही संसदेत चर्चा करतो, की तंत्रज्ञान कसं येणार. खेड्यात लोकांकडे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. आता ते भाषण द्यायला सांगतात, काय कारण आहे माहित नाही, पण माझा अनुभव वेगळा आहे. तंत्रज्ञानाने इतकी क्रांती आणली आहे. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. तर तिथे करपाडा नावाचं एक गाव आहे, तिथे गेलो होतो. अतिशय मागासलेला तालुका आहे, अतिशय दुर्गम भागात आदिवासी गावात दूध शीतगृहाच्या उद्‌घाटनाचा एक कार्यक्रम होता. त्या गावात सभा आयोजित करायला मैदान देखील नव्हतं, कारण आजूबाजूला सगळं जंगलच होतं. त्यामुळे तिथून तीन किलोमीटर दूर एका शाळेच्या मैदानात कार्यक्रम ठेवला होता. मी त्या शीतगृहाच्या उद्‌घाटनाला गेलो होतो. तिथे 25-30 दुध भरणाऱ्या महिला देखील होत्या. त्या भगिनी तिथे उभ्या होत्या. आम्ही तिथे, दीप प्रज्वलन, फीत कापणे असे सर्व करत होतो. आणि मी बघितलं की सगळ्या महिला, आणि ही १० वर्षांपुर्वीची गोष्ट सांगतो आहे, सगळ्या महिला, आदिवासी महिला आपल्या मोबाईल फोन वर फोटो काढत होत्या. मला आश्चर्य वाटलं. मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हटले, तुमचा फोटो तर निघत नाही. माझा फोटो काढून काय करणार? तुम्हाला फोटो काढता येतो का? आदिवासी भगिनी होत्या. निरक्षर होत्या. त्यांनी मला काय उत्तर दिले? त्या उत्तराचा माझ्या मनावर फार प्रभाव पडला. त्या म्हणाल्या, हे फोटो आम्ही जाऊन डाऊनलोड करवून घेऊ. मी आश्चर्यचकित झालो, ह्या भगिनी अशिक्षित आहेत आणि म्हणताहेत की आम्ही जाऊन डाउनलोड करवून घेऊ!

कशा प्रकारे तंत्रज्ञानाने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात प्रवेश केला आहे. आम्ही आपल्या व्यवस्थेत, आता तुम्ही या गावात, भारत सरकारने सामायिक सेवा केंद्र उघडले आहेत. तुम्ही कधी बघितलं आहे का, की सामायिक सेवा केंद्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने इथे जे युवक आहेत त्यांना तिथे रोजगार उपलब्ध झाला आहे, त्यांच्याकडे कॉम्पुटर आहे, काय काय सेवा देत आहेत? त्या सेवा आपल्या गावातकरिता कश्या उपलब्ध होऊ शकतात, तुम्ही ह्या व्यवस्थेचा फायदा घेऊ शकता की नाही? माझ्या म्हणण्याचे तात्पर्य इतकेच आहे की, आपण गरजेनुसार, पूर्ण प्रयत्न करून तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या गावात आणणाच्या दिशेने प्रयत्न करावे. तुम्ही बघाल, ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण गावात खूप मोठा बदल घडवून आणू शकतो.

आम्हाला कदाचित सगळं येत नसेल. पण ज्यांना हे ज्ञान आहे त्यांची मदत आपण घेऊ शकतो. पुरुषांनी आपला अहं सोडला पाहिजे, आपल्या घरात 12 वी ला मुलगा असेल तर त्याला विचारलं तर तो देखील सांगेल, असं असं करायला पाहिजे. पण एकदा तुम्ही बघाल की आपली ताकद अनेक पटींनी वाढेल.

आपण खेड्यात राहतो. कधी हा विचार केला का की आपल्या गावात सरकारी नोकरी करणारे किती लोक राहतात? कुणीही हा विचार केला नसेल. ज्यांना सरकारी तिजोरीतून पगार मिळतो ते एका अर्थी सरकारी नोकरीतच असतात. आपण महिन्यातून किमान एकदा तरी छोटीशी सरकारी बैठक घेऊ शकतो? कुणी सरकारी बसचा चालक असेल, तो आपल्याच गावात राहत असेल.

कुणी वाहक असेल, कुणी शिपाई असेल, कुणी कारकून असेल, कुणी शिक्षक असेल, ज्यांना सरकारी तिजोरीतून पगार मिळत असेल. प्रत्येक गावात 15-20 लोक असे असतीलच, जे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकारशी संबंधीत असतील. हे लोक, जे सरकारचे प्रतिनिधी आहेत, सरकारी पगार घेतात, सरकार म्हणजे काय हे त्यांना माहित आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओळखतात, आपल्या गावातील लोकांची, जे दुसऱ्या ठिकाणी कामाला जातात, पण संध्याकाळी गावात परत येतात, महिन्यातून किमान एकदा बैठक घेऊन आपण गावासाठी काय करू शकतो? सरकार कडून कुठली मदत मिळू शकते? ती मदत कशी मिळवायची? कुणाची कुठे ओळख आहे का? ही व्यवस्था तयार केली तर तुमची ताकत वाढेल.

आज काय होतं, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला फक्त पटवारी दिसतो, आणि कुणी नाही. पण आंगणवाडी कर्मचारी असो, आशा कर्मचारी असो, शिक्षक असो हे सगळे सरकारी प्रतिनिधी आहेत. आपण कधी ह्यांच्याशी मैत्री केली नाही. माझा आग्रह आहे की तुम्ही ह्या लोकांशी मैत्री करा. तुमची ताकत कैक पटींनी वाढेल आणि आपली कामे सहजतेने होतील.

आणखी एक काम, वर्षातून एकदा तरी नक्की करा. आपल्या गावातून अनेक लोक शहरात गेले असतील. कधी लग्न समारंभासाठी येत असतील, नातेवाईकांना भेटायला कधी येत असतील. अशावेळी गावाचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. आपण कुणी हा विचार केला आहे की गावकऱ्यांना माहित नाही गावाचा जन्मदिवस कोणता आहे, त्यांनी ईश्वर चिट्ठी काढून एक तारीख ठरवावी आणि तो दिवस गावाचा जन्मदिवस म्हणून साजरा करायला सुरुवात करावी. गावाचा दर वर्षी जन्मदिवस वाजत गाजत, उत्साहात साजरा केला गेला पाहिजे. आणि त्या दिवशी, आपल्या गावातील जितके लोक बाहेर गेले असतील त्यांना आमंत्रण दिले पाहिजे. तीन चार दिवस हा कार्यक्रम केला पाहिजे. गावातील ७५ वर्षांच्या वरील वयाच्या लोकांचा सत्कार केला पाहिजे. गावात प्रत्येकाने एक रोप लावलं पाहिजे, गावातील मुलांना साफ सफाईच्या मोहिमेत सामील करून घेतलं पाहिजे आणि विशेषतः जे लोक गावं सोडून गेले आहेत त्यांना खास करून बोलावले पाहिजे आणि विचारले पाहिजे की ते गावासाठी काय करू शकतात. तुम्ही बघाल सगळं गावं कसं जिवंत होऊन उठेल. आज गाव म्हटलं की अरे, जाऊ द्या, एकदा का 18 वर्षांचे झालो की निघून जायचं, काय करायचं गावात राहून असं जीवन जागून. हे चक्र उलट फिरवण्याची वेळ आली आहे आणि जर तुम्ही ते केलं, तर मला विश्वास आहे की, आपल्या गावात एक नवचैतन्य संचारेल.

आणि जसं मी म्हणालो, आमच्या गावात जनावरं देखील खूप असतात. काही लोक इथे बघायला गेले असतील, मला सांगण्यात आलं आहे की इथे, गांधीनगर जवळच जनावरांचं वसतिगृह असलेली अनेक गावं आहेत. आपण बघितलं असेल की कसं कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली जाते. ज्याला आपण कचरा समजतो, खरं म्हणजे तो कचरा नसून संपत्ती आहे. आपण गावात प्रयत्न करा, काही लोकं एकत्र करा, बचत गट स्थापन करा. गावातील कचऱ्यातून खत तयार करा. ह्या खताच्या विक्रीतून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळेल आणि गावाच्या जमिनीचा पोत सुधारेल आणि लोकांची शेती पण सुधारेल. छोटी छोटी कामं, ज्यासाठी वेगळ्या निधीची गरज नाही. आपण स्वतः थोडा पुढाकार घेतला तर, आपल्या गावाला जसं स्वच्छ केलं तसं स्वयंपूर्ण देखील करू शकाल. स्वच्छता आपण आता आपल्याला सवयीची झाली आहे, आणि ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला स्वतः करावी लागते. समजा, आपण कुठे जात असताना, अचानक आपल्या अंगावर घाण पडली कुठली घाण वस्तू पडली. कुणी तरी येऊन ती साफ करेल ह्याची आपण वाट बघतो का? की आजूबाजूला जातो, जेणेकरून कुणीतरी ती घाण साफ करेल. तुम्ही कितीही मोठे व्यक्ती असाल, खिशातून रुमाल काढून साफ करायला लागतो. का? आपण एक क्षण देखील घाण सहन करू शकत नाही. आपल्या शरीरावर थोडी जरी घाण पडली तरी, आपण लगेच साफ करतो. तसच ही आपली माता आहे. भारतमाता. तिच्या अंगावर जर घाण असेल तर ती आपल्याला सर्वांना मिळून साफ करावी लागेल. स्वच्छता आपल्या स्वभावाचा एक भाग बनवून घ्या. जर स्वच्छतेला स्वभावाचा भाग बनवलं आणि एकदा का घाण गेली, मग बघा देशातून कुपोषणाची समस्या, रोगराई ची समस्या, आजारपणावरील खर्च हे सगळं आपोआप कमी होईल.

गरिबांना जास्त फायदा होईल. अस्वच्छतेचा सगळ्यात जास्त त्रास गरिबांना होतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना होतो, अशुद्ध पाणी पिणाऱ्यांना होतो. हे सर्व मानवतेचं काम आहे, हे काम जर आपण त्याच भावनेनं केलं, जनसेवा हीच ईशसेवा, असं आपण म्हणतो. जर ह्याच भावनेनं आपण काम केलं तर मला विश्वास आहे, 2019 मध्ये स्वच्छ भारत अभियानात काहीतरी उद्दिष्ट गाठायचं आहे. बदल जाणवेल अशी परिस्थिती निर्माण करायची आहे आणि हे सरकारची प्रतिमा तयार करायला नाही आणि माझी ही. हा समाजाचं स्वभाव बनला पाहिजे. समाजात आंदोलन उभं करावं लागेल. घाण आणि कचऱ्या विषयी तिरस्कार निर्माण करावा लागेल, तेंव्हा आपोआप होईल. शौचालये ह्याच मोहिमेचा एक भाग आहेत. शौचालय तयार झालं म्हणजे स्वच्छता झाली, अशी आमची कल्पना नाही, आणि या पूर्वी देशात स्वच्छतेविषयी कधीच चर्चा झाली नाही. बरं झालं गेल्या दोन वर्षांपासून ही चर्चा तरी होते आहे. आणि मी हे पण जाहीरपणे काबुल करतो की सामान्यपणे सरकार ने काही म्हटलं की लगेच माध्यमे त्यात त्रुटी काढायला सुरुवात करतात, काय कमी आहे, काय चुकीचं आहे, काय खोटं सांगितलं आहे, त्याला ते बरोबर पकडतात.

मी बघितलं आहे, स्वच्छता हा एक असा विषय आहे, माध्यमांनीही तो उचलून धरला आहे आणि सरकार जितकं काम करत आहे, त्यापेक्षा जास्त काम माध्यमं करत आहेत. ही एक अशी मोहीम आहे, जी देशाच्या प्रत्येक नागरिकाने स्वीकारली आहे, प्रत्येकाने स्वीकारली आहे. आणि जे काम प्रत्येकाने स्वीकारलं आहे, त्यात यश हे नक्की मिळतच. फक्त त्याची अचूक व्यवस्था तयार करावी लागेल. फक्त स्वच्छतेचे मंत्र म्हणून चालणार नाही. आम्हाला स्वतःला ते करावं लागेल. आणि गावा गावात सफाई होईल आणि हिंदुस्तान बदललेला दिसेल. आपलं जीवन बदललेलं दिसेल.

आज ज्या ज्या लोकांचा सत्कार झाला आहे, त्या सर्वांना मी अनेक अनेक शुभेच्छा देतो. आणि त्याचं जीवन, त्यांचं कार्य, त्यांचं पुरुषार्थ, त्यांचं संकल्प आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल. आणि देशभरातून आलेल्या महिला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस यांचा सरळ सरळ संबंध आहे. कारण आजवर जी काही स्वच्छता आपल्या देशात आहे, ती फक्त नारी शक्ती मुळेच शक्य झाली आहे. प्रत्येक प्रकारची स्वच्छता, सामाजिक जीवनातील प्रत्येक पैलूची स्वच्छता, आजही टिकून आहे, संस्कार टिकून आहेत, सद्कार्य टिकून आहे त्यात सर्वात जास्त योगदान मातृ शक्तीचं आहे.

स्वच्छतेच्या ह्या मोहिमेला मातृ शक्तीचे आशीर्वाद मिळोत, अभूतपूर्व सफलता मिळेल असा मला विश्वास आहे. ह्या विश्वासासोबतच आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.