चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या केंद्रीय राजकीय आणि कायदेविषयक व्यवहार आयोगाचे सचिव सन्माननीय मेंग जिआंझू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
भारत आणि चीन यांच्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. अशा भेटी उभय देशात धोरणात्मक सांमजस्य उभारणीला बळकटी देत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
मे 2015 मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या यशस्वी चीन दौऱ्याचे स्मरणही त्यांनी यावेळी केले तसेच सप्टेंबर 2016 मध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी हाँगझू प्रांताला दिलेल्या भेटीची आठवण केली.
दहशतवादाचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्यासह दोन्ही देशांच्या दृष्टीने हिताच्या मुद्यांविषयी उभय नेत्यांनी या भेटीत चर्चा केली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवादाचा अतिशय गंभीर धोका आहे असे स्पष्ट करुन पंतप्रधानांनी दहशतवादाला आळा घालण्यासंबंधित विषयांवर भारत आणि चीन यांच्यामध्ये होत असलेल्या सहकार्यवृद्धीचे स्वागत केले.