Inauguration of India International Exchange is a momentous occasion for India’s financial sector: PM
Indians are now at the forefront of Information Technology and Finance, both areas of knowledge where zero plays a crucial role: PM
India is in an excellent time-zone between West & East. It can provide financial services through day & night to the entire world: PM
IFSC aims to provide onshore talent with an offshore technological and regulatory framework: PM Modi
Gift city should become the price setter for at least a few of the largest traded instruments in the world: PM

गुजरातच्या गांधीनगर येथे आज या गिफ्ट (गुजरात आंतरराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान सिटी)सिटीमध्ये भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शेअरबाजाराचे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे. भारतीय वित्तीय क्षेत्रासाठी हा निश्चितच अतिशय महत्वाचा क्षण आहे.

तुम्हाला माहीतच आहे की, हा प्रकल्प २००७ साली आकाराला आला. ह्या प्रकल्पातून केवळ भारतासाठी नाही तर जागतिक दर्जाचे वित्तीय आणि माहिती तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याचा दृष्टीकोन होता.

त्या काळात, मी जिथे जिथे जायचो, तिथे तिथे मी त्या देशातील काही महत्वाच्या अर्थतज्ञांना भेटायचो, त्यांच्याशी चर्चा करायचो. अनेक ठिकाणी मग ते न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर , हॉंगकॉंग किंवा अबुधाबी असो , सगळीकडे मला भारतीय वंशाचे अर्थतज्ञ भेटायचे. जागतिक अर्थविश्वा विषयीची त्यांची समाज आणि ज्ञान पाहून मी अतिशय प्रभावित व्हायचो. त्यांच्या संबंधित देशात त्यांनी दिलेले योगदानही अतिशय मोलाचे होते.

त्यावेळी मी विचार करत असे, “ मी ही गुणवत्ता भारतात परत कशी आणू शकेन? आणि त्याचबरोबर संपूर्ण वित्तीय जगाला वित्तीय नेतृत्व देण्यासाठी काय करता येईल?”

भारताला गणिताची अतिशय प्राचीन परंपरा आहे. भारतातच दोन हजार वर्षांपूर्वी शून्याचा आणि दशमान पध्दतीचा शोध लावला. त्यामुळे ज्यात शून्याचा अतिशय महत्वाचा उपयोग असलेल्या अर्थविश्व आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आज जेव्हा भारतीय लोकच आघाडीवर आहेत, हा निव्वळ योगायोग नाही.

जेव्हा गिफ्ट सिटीची संकल्पना साकार होत होती, तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी तंत्रज्ञानाच्या प्रगतीत कित्येक पटीने वाढ झाली होती. आपल्याकडे भारतात आणि परदेशात काम करणारे जागतिक दर्जाचे भारतीय लोक होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करू शकेल, इतकी गुणवत्ता भारतात होती. तंत्रज्ञान क्षेत्र आणि अर्थविश्वाची लग्नगाठच बांधली गेली होती. आपल्याला हे आता स्पष्टपणे कळले आहे की, अर्थविश्व आणि तंत्रज्ञान यांच्यात परस्पर संबंध आहे , त्याला ‘फिन्टेक” असेही म्हटले जाते. हे क्षेत्र भारताच्या भविष्यातील विकासात महत्वाची भूमिका बजावू शकते.

अर्थाविश्वात भारताला वैचारिक गुरु कसे बनवता येईल, याबद्दल मी देशविदेशातील अनेक तज्ञाशी चर्चा करत असे. हे तर स्पष्ट आहे की जर आपल्याला जगभरातल्या बाजारांशी व्यवहार करायचा असेल तर आपल्याला त्यासाठी सर्वोत्तम सुविधा आणि क्षमता आवश्यक असतील. गिफ्ट सिटीची स्थापना एका निश्चित उद्दिष्टातून झाली होती. अर्थविश्व आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय बुद्धीमान आणि उत्तम युवक भारतात आहेत. या गुणवत्तेला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा आमचा उद्देश्य होता. आज या जागतिक शेअरबाजाराची सुरुवात होत असताना आपण आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, असेच आपल्याला म्हणता येईल.

 

२०१३ च्या जून महिन्यात एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी मी मुंबई शेअरबाजाराला भेट दिली होती. त्याचवेळी मी मुंबई शेअरबाजाराला जागतिक दर्जाचा शेअरबाजार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले होते. २०१५ साली, व्हायब्रांट गुजरात परिषदेत त्यांनी याविषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. आज मी या नव्या आंतरराष्ट्रीय शेअरबाजाराचे उद्घाटन करतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे. एकविसाव्या शतकासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने, या जागतिक शेअरबाजाराच्या रूपाने आपण एक मैलाचा दगड आज पार केला आहे.

या शेअरबाजारात पहिल्या टप्प्यात समभाग , कमोडीटी, चलन आणि वित्तीयसुरक्षाव्याजदरयांचे व्यवहार होतील असे मला सांगण्यात आले आहे. नंतरच्या टप्प्यात यात भारतीय आणि परदेशी कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार केले जातील. मसाला बॉण्डयेथे व्यवहारासाठी उपलब्ध राहतील. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील अनेक देश या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रातून निधी उभा करू शकतील. हा शेअरबाजार जगातला सर्वात जलदगतीने व्यवहार होऊ शकणारा बाजार असेल ज्यात आधुनिक पध्दतीने व्यवहार, पैशांचे हिशेब आणि इतर कामे त्वरीत करणारी यंत्रणा असेल. पश्चिम आणि पौर्वात्य देशांमध्ये भारतीय प्रमाणवेळ अतिशय योग्य असून दोन्ही दिशेच्या देशाना व्यवहारासाठी अनुकूल वेळेत भारत रात्रंदिवस सुविधा पुरवू शकते. मला सांगण्यात आले आहे की ह्या बाजारात दिवसाचे २२ तास व्यवहार होतील. जपानचा शेअरबाजार सुरु व्हायच्या वेळी हा बाजार सुरु होईल आणि अमेरिकेचा बाजार बाद होत असताना हा बाजार बंद होईल. या बाजारामुळे शेअरबाजारात सेवा सुविधांच्या गुणवत्तेचे तसेच जगातील सर्व ठिकाणच्या प्रमाणवेळेत सुविधा पुरवण्याचे नवे मापदंड स्थापन केले जातील अशी मला खात्री आहे.

गिफ्ट सीटीमधला हा शेअरबाजार आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचा (आय एफ एस सी) एक भाग असेल. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची संकल्पना अतिशय साधी मात्र महत्वाची आहे.परदेशातील तांत्रिक आणि नियमन आराखड्याच्या मदतीने देशातील बुद्धीमान मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे या संकल्पनेमागचे उद्दिष्ट आहे.यातून भारतीय कंपन्याना परदेशी वित्तीय केंद्रासोबत स्पर्धा करण्यासाठी पुरेशी साधने आणि सेवा उपलब्ध होतील. गिफ्ट सीटी आय एफ एस सी त्याना कुठल्याही आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या तोडीच्या सुविधा पुरवू शकेल.

भारतासारख्या विशाल देशात, जिथे देशांतर्गत मोठा शेअरबाजार अस्तित्वात आहे, तिथे परदेशातल्यासारखे वातावरण निर्माण करणे सोपी गोष्ट नाही. छोट्या छोट्या शहरांच्या देशांशी भारताची तुलना होऊ शकत नाही. अशा देशांमधले देशांतर्गत बाजार खूप छोटे आहेत. त्यामुळे तिथे गुंतवणूकदारांसाठी लाभकारक अशी कररचना आणि नियमन व्यवस्था आहे. भारतासारख्या मोठ्या देशात हे शक्य नाही. त्यामुळेच, भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र उभारणे हे एक मोठे आव्हान आहे. मला याचा आनंद आहे की केंद्रीय वित्त मंत्रालय, भारतीय रिजर्व्ह बँक आणि सेबीने यांतील नियमनाशी संबंधित मुद्द्यांवर योग्य तोडगा काढला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अशी टीका होत होती, की भारतातील बहुतांश व्यवहार हे परदेशात होतात. भारतीय वित्तीय संस्थांचे व्यवहार सुद्धा परदेशी संस्थामध्ये व्यवहार करतात.असेही म्हंटले जात असे की भारतीय वित्तीय उत्पादनांसाठी मूल्यनिश्चिती करण्याचे अधिकारही भारत वापरत नसे. मात्र आता गिफ्ट सिटीच्या रुपाने या टीकेला उत्तर मिळेल अशी आशा आहे. मात्र या गिफ्ट सिटीविषयी माझा दृष्टीकोन अधिक व्यापक आहे. माझी अशी इच्छा आहे , की पुढच्या दहा वर्षात गिफ्ट सिटी जागतिक दर्जाच्या किमान काही शेअरबाजार संस्थांमध्ये समभागांचे मूल्य निर्धारण करण्याइतकी सक्षम व्हायला हवी. मग त्या कमोडीटी असो, चलन असो ,समभाग किंवा व्याजदर, किंवा मग इतर कुठली वित्तीय उत्पादने असोत.

येत्या 20 वर्षात भारतात ३० कोटी नव्या नोकऱ्या तयार करण्याची गरज आहे. हा एक खूप मोठा प्रयत्न आहे. कुशल आणि सेवा क्षेत्रातील उत्तम पगारदार नोकऱ्या हा या रोजगार क्रांतीचा मोठा भाग असेल. या गिफ्ट सिटीतून आपल्या तरुणांना बाहेरच्या जगाची ओळख आणि त्यात काम करण्याची अधिकाधिक संधी मिळेल, त्यातून ते अंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करू शकतील.मी भारतीय कंपन्याना, विनिमय आणि नियंत्रण संस्थांना अशी विनंती करतो की त्यांनी, अनुभवी आणि जागतिक दर्जाच्या वित्तीय व्यावसायिकांची एक फळी तयार करावी. ही फळी या गिफ्ट सिटीमध्ये काम करू शकेल आणि संपूर्ण जगाला सेवा पुरवू शकेल. पुढच्या दहा वर्षात , या सिटीतून कित्येक लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल, अशी मला अपेक्षा आहे.

स्मार्ट सिटीच्या विकासाला मी किती महत्व देतो , याची आपल्याला कल्पना आहेच. गिफ्ट सिटी ही खऱ्या अर्थाने देशातील पहिली स्मार्ट सिटी आहे असे मी म्हणेन. गिफ्ट सिटीने , जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काय विशेष परिश्रम घेतले याचा अभ्यास सगळ्या १०० स्मार्ट सिटीच्या रचनेत केला जाईल. पुढच्या एकाच पिढीत भारत एक विकसित राष्ट्र बनू शकतो, असा विश्वास मी याआधीही व्यक्त केला होता. ही नवी शहरे, आपल्या स्वप्नातला भारत देश बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात.

एक आत्मविश्वासपूर्ण भारत

एक संपन्नभारत

एक एकात्मिक भारत

आपला भारत

भारतीय आंतरराष्ट्रीय शेअरबाजार सुरु झाला आहे ,असे मी घोषित करतो. गिफ्ट सिटी आणि भारतीय आंतरराष्ट्रीय शेअरबाजाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद !