व्हिएतनाममधल्या हनोई इथल्या कुआन सु पॅगोडाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. पंतप्रधानांनी इथे प्रार्थनाही केली. भिख्खूंनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. या पॅगोडाला भेट देण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे पंतप्रधानांनी भिख्खूंशी संवाद साधताना सांगितले.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1959 मध्ये या पॅगोडाला भेट दिल्याचे स्मरणही पंतप्रधानांनी करुन दिले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात दोन हजार वर्षांपासून पुर्वापार संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. काही जण युध्द करण्यासाठी आले मात्र, भारत शांततेचा संदेश घेऊन पुढे आला. बुध्दांचा हा शांततेचा संदेशच टिकून राहिल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जगाने शांततेच्या मार्गावरुनच वाटचाल केली पाहिजे, हा मार्गच आनंद आणि भरभराटीकडे नेतो असे पंतप्रधान म्हणाले. भारतातुन समुद्र मार्गाने बौध्द तत्वज्ञान व्हिएतनामकडे गेले आणि म्हणूनच व्हिएतनामला या तत्वज्ञानाचं सर्वात शुध्द रुप मिळाल्याचे ते म्हणाले. भारतात प्रवास करु इच्छिणाऱ्या भिख्खूंच्या चेहऱ्यावरती भारताबद्दल आपल्याला अपार उत्सुकता दिसल्याचे त्यांनी नमूद केले.
गौतम बुध्दांच्या भूमिला तसेच विशेषकरुन आपण संसदेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या वाराणसीला भेट देण्याचे निमंत्रण पंतप्रधानांनी त्यांना दिले.