Tajikistan is a valued friend and strategic partner in Asia: PM Modi
Terrorism casts a long shadow of violence and instability over the entire region (Asia): PM Modi
Appreciate Tajikistan’s role in the Central Asian region as a mainstay against forces of extremism, radicalism, and terrorism: PM
Our planned accession to the Ashgabat Agreement will further help in linking us to Tajikistan and Central Asia: PM

 

महामहीम इमोमली रेहमान

ताजिकिस्तानचे राष्ट्रपती,

स्त्री आणि पुरुष गण,

माध्यमांचे सदस्य,

 राष्ट्रपती रेहमान  आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे मी भारतात स्वागत करतो. ताजिकिस्तान आशियातील मौल्यवान मित्र आणि धोरणात्मक भागीदार आहे. राष्ट्रपती रेहमान स्वतः भारताशी खूप परिचित आहेत. भारतात पुन्हा त्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या नेतृत्वाची भारतात आम्ही प्रशंसा करतो. आमची धोरणात्मक भागीदारी परस्परांप्रति आदर, विश्वास, प्रादेशिक सुरक्षा आणि विकासाच्या परस्पर हिताच्या आधारावर उभी आहे. आमचे देश आणि समाज यांना खोलवर रुजलेल्या इतिहास आणि वारशाबद्दल नैसर्गिक प्रेम आहे. भूतकाळातील आमचे सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक संबंधांचे रूपांतर मैत्रीत झाले असून त्यातून आजचे दोन्ही देशातील लोकांमधील संबंध प्रतिबिंबित होतात.

मित्रांनो,

राष्ट्रपती रेहमान आणि माझ्यात आज फलदायी चर्चा झाली. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील आमच्या भागीदारीसह आमच्या द्विपक्षीय संबंधाच्या विविध स्तंभांतर्गत, साध्य केलेल्या व्यापक प्रगतीचे आम्ही मूल्यमापन केले. भारत आणि ताजिकिस्तान विस्तारित शेजारी देश आहेत , ज्यांना अनेक सुरक्षा आव्हाने आणि धोके यांचा सामना करावा लागतो. दहशतवादाचा केवळ आपल्या दोन देशांनाच धोका नाही, तर संपूर्ण प्रदेशावर हिंसाचार आणि अस्थैर्याची मोठी सावली आहे. म्हणूनच दहशतवादाचा सामना करणे हा आपल्या सहकार्यात्मक संबंधांचा प्रमुख भाग आहे. उग्रवाद, जहालवाद आणि दहशतवादी शक्तींविरुद्ध पाठिंबा म्हणून मध्य आशियातील ताजिकिस्तानच्या भूमिकेची आम्ही प्रशंसा करतो. या आघाडीवर परस्परांच्या प्राधान्यानुसार कृती मजबूत करण्यासाठी राष्ट्रपती रेहमान आणि माझ्यात सहमती झाली.

बहुस्तरीय पातळीवर आम्ही हे करू-

-एकूणच द्विपक्षीय सुरक्षा सहकार्याची पुनर्स्थापना

-अधिकाधिक प्रशिक्षण, क्षमता निर्मिती आणि माहितीचे आदान-प्रदान

-प्रादेशिक आणि बहुस्तरीय संदर्भातील सक्रिय समन्वय

प्रादेशिक सुरक्षा आणि दहशतवादाचा बीमोड करण्याच्या प्रयत्नांवर ताजिकिस्तानबरोबर काम करण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेचे भारताचे सदस्यत्व महत्वाचे व्यासपीठ ठरेल. आमच्या प्रदेशातील विकासावर राष्ट्रपती रेहमान आणि मी एकमेकांची मते जाणून घेतली. अफगाणिस्तानातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रदेशासाठी महत्त्वाची असल्याबाबत आमच्यात एकमत झाले. अफगाणी जनतेच्या शांततामय आणि समृद्ध देशाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी भारत आणि ताजिकिस्तान एकत्र आले आहेत.

मित्रांनो,

आमचे आर्थिक संबंध विशेषतः व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रमाण आणि व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याबद्दल राष्ट्रपती आणि माझे एकमत झाले. यासंदर्भात जलविद्युत निर्मिती, माहिती-तंत्रज्ञान, औषध आणि आरोग्यसेवा ही प्राधान्य क्षेत्रे असतील. आमच्या देशाच्या हितासाठी आमच्या आर्थिक भागीदारीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी वाढीव भू-संपर्क महत्त्वाचा असल्यावर  आमच्यात सहमती झाली. सध्याच्या बंदर आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यांना रस्ते आणि रेल्वे मार्गे अफगाणिस्तान, तझाकिस्तान आणि मध्य आशियाशी जोडण्याच्या उपक्रमांना भारताचा पाठिंबा आहे. या बाबतीत इराण मधील चाबहार बंदराच्या माध्यमातून व्यापार आणि वाहतूक संबंध स्थापित करण्यासाठी आम्ही काम करू. तझाकिस्तानसह अन्य सदस्यांबरोबर आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत कार्यरत आहे.

आमच्या नियोजित अशगाबत करारामुळे ताजिकिस्तान आणि मध्य आशियाशी आम्हाला जोडण्यात मदत मिळेल. भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य प्रशिक्षण कार्यक्रमासह क्षमता आणि संस्था निर्मितीमध्ये भारत आणि ताजिकिस्तानची भागीदारी आहे. ही भागीदारी अधिक मजबूत आणि शाश्वत करण्यावर राष्ट्रपती रेहमान आणि माझे एकमत झाले.

मित्रांनो,

पुढील वर्षी, भारत आणि ताजिकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंधांचा २५ वा वर्धापनदिन आम्ही साजरा करणार आहोत. या दौऱ्यात मी आणि राष्ट्रपती रेहमान यांनी आपल्या देशांसाठी ठरवलेल्या व्यापक कार्यक्रमांनी मी प्रोत्साहित झालो आहे. आज करण्यात आलेले करार आणि आमच्यात झालेली चर्चा यामुळे भारत आणि ताजिकिस्तान दरम्यान विविध क्षेत्रात प्रत्यक्ष सहकार्याला चालना मिळेल अशी मी आशा करतो. मी पुन्हा एकदा राष्ट्रपती रेहमान यांचे स्वागत करतो आणि त्यांचे येथील वास्तव्य आनंदात जावो अशा शुभेच्छा देतो.

धन्यवाद , खूप-खूप धन्यवाद.