Both our societies share deep rooted historical ties and civilizational linkages: PM Modi to Nepalese PM
As immediate neighbours and close friendly nations, peace, stability, and economic prosperity of Nepal is our shared objective: PM
At every step of Nepal's development journey and economic progress, we have been privileged to be your partner: PM Modi
Open borders between our countries provide great opportunities for cooperation and interaction among our people: PM Modi to Nepalese PM
India’s initiatives for open sky, cross-border power trade, transit routes, cross-border connectivity would directly benefit Nepal: PM

नेपाळचे पंतप्रधान महामहिम पुष्पा कमल दहल प्रचंदा, नेपाळी शिष्टमंडळातील मान्यवर सदस्य,

प्रसारमाध्यमांमधील मित्रगण,

आमच्या मैत्रीच्या इतिहासातील आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे.

पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यावर आलेले महामहिम प्रचंदा आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचे भारतात स्वागत करण्यास मला अतिशय आनंद होत आहे.

मित्रांनो,

आमच्या दोन्ही देशांच्या समाजांमध्ये निर्माण झालेल्या ऐतिहासिक भागीदारीची आणि सांस्कृतिक संबंधांची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. नद्यांच्या पाण्याची परस्परांमध्ये वाटणी, खुल्या सीमा आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये असलेले परस्परसंबंध यांची वीण दोन्ही देशांदरम्यान आहे. आमच्या सरकारांदरम्यान असलेल्या आमच्या संबंधांसोबतच परस्परांशी जोडले गेलेल्या दोन्ही देशाच्या समाजांमुळे आमच्या भागीदारीला एक मोठी खोली आणि ओळख प्राप्त झाली आहे.

ज्या प्रकारे आम्ही एकमेकांच्या चांगल्या कामगिरीचा आनंद एकत्र साजरा करतो, तशाच प्रकारे संकटाच्या काळातही आम्ही एकमेकांच्या समस्यांचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न करतो.

आमची मैत्री खरोखरच अनोखी आणि काळाच्या कसोटीवर खरी ठरलेली आहे.

आमचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र या नात्याने नेपाळची आर्थिक समृद्धी हे आमचे सामायिक उद्दीष्ट आहे.

नेपाळच्या विकासाची वाटचाल आणि आर्थिक प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचा भागीदार बनण्याचा सन्मान आम्हाला मिळाला आहे.

नेपाळमधील लोकशाही संस्थांना बळकट करण्यामध्ये तुम्ही स्वतःदेखील जी भूमिका निभावली आहे तिची देखील आम्ही प्रशंसा करतो.

नेपाळमध्ये शांतता निर्माण करण्याला चालना देणारा घटक म्हणून तुम्ही कार्य केले आहे. तुमच्या वैविध्यपूर्ण समाजातील सर्व घटकांच्या आशाआकांक्षांचा विचार करून त्यांना सामावून घेताना समावेशक संवादाच्या माध्यमातून तुमच्या राज्यघटनेची यशस्वी अंमलबजावणी तुमच्या नेतृत्वाखाली नेपाळला करता येईल असा मला विश्वास वाटत आहे.
तुमच्या या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.

मित्रांनो,

आज आमच्या प्रदीर्घ आणि फलदायी चर्चेदरम्यान पंतप्रधान प्रचंदा आणि मी द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा सखोल आढावा घेतला.

नेपाळच्या विकासाच्या प्रक्रियेतील भागीदारीला बळकट करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असल्याचा संदेश मी पंतप्रधान प्रचंदा यांना दिला आहे. नेपाळची जनता आणि सरकार यांच्या प्राधान्यक्रमाच्या बाबींसह आम्ही हे सर्व करणार आहोत.

या संदर्भात आम्ही आज नेपाळमधील भूकंपा नंतरच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी 750 दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचा करार केला आहे.

नेपाळमध्ये गेल्या वर्षी झालेल्या महाभयंकर भूकंपाची झळ पोहोचलेल्या लक्षावधी लोकांना यामुळे दिलासा मिळेल असा मला विश्वास आहे.

तसेच तराई रस्त्यांचा दुसरा टप्पा, वीज वाहक तारा, उपकेंद्रे आणि कास्की येथे तंत्रनिकेतन यांसारख्या नव्या प्रकल्पांसाठी देखील अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी भारताने दर्शवली आहे.

मित्रांनो,

अतिशय भक्कम आर्थिक प्रगती आणि विकास करण्याचे आमचे सामायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आमच्या समाजांना सुरक्षा प्रदान करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान प्रचंदा आणि मी लक्षात घेतले आहे.

आमचे सुरक्षाविषयक हितसंबंध अतिशय सारखे आणि एकमेकांशी संबंधित असल्याबाबतही आम्ही सहमती व्यक्त केली आहे.

आमच्या देशांदरम्यान खुल्या असलेल्या सीमांमुळे आमच्या नागरिकांमध्ये संवाद आणि सहकार्य निर्माण होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

पण त्याचवेळी आमच्या या खुल्या सीमांचा गैरवापर करणाऱ्या विघातक करणाऱ्या घटकांपासून या सीमांचे रक्षण करण्याची गरज देखील आपण ओळखली पाहिजे.

त्यामुळेच आमची संरक्षण दले व सुरक्षा संस्था यांच्यातील सहकार्याचे संबंध टिकून राहणे आमच्यातील वाढणारा व्यापार, आर्थिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक भागीदारीसाठी आणि दोन देशांमधील जनतेच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.



मित्रांनो,

व्यापार, संपर्कव्यवस्था, विकास प्रकल्प आणि परस्पर सहमतीने होणारी गुंतवणूक हे नेपाळशी असलेल्या आमच्या भागीदारीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत.

खुल्या हवाई सीमा, सीमापारचा उर्जा व्यापार, प्रवासाचे मार्ग, सीमापार संपर्कव्यवस्था यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकारांचा नेपाळला थेट फायदा होणार आहे आणि आमच्या आर्थिक भागीदारीला बळकटी मिळणार आहे.

नेपाळ आणि भारत उर्जा आणि जल संसाधन क्षेत्रांसहित आर्थिक भागीदारीच्या विविध क्षेत्रातही सहकार्याच्या भावनेने कार्य करत आहेत.

सध्या सुरू असलेले जलविद्युत निर्मिती प्रकल्प आणि वीजवाहक तारांचे कार्यान्वयन आणि विकास यांची जलदगतीने आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबतही पंतप्रधान प्रचंदा आणि मी सहमती व्यक्त केली आहे.

नेपाळमध्ये महसुलाच्या निर्मितीचा आणि अत्यावश्यक असलेल्या उर्जेचा हा एक स्रोत ठरेल.

आमच्या समाजांमध्ये असलेल्या संबंधांना अधिक सखोल आणि महत्त्वाचे बनवण्याच्या गरजेवरही आम्ही सहमती व्यक्त केली आहे.

दोन्ही देशांमधील आमच्या सामायिक बुद्धीस्ट वारसास्थळांना अधिक जास्त प्रकाशात आणणे, आणि आयुर्वेद आणि इतर पारंपरिक औषधांवर भर देण्यावरही आम्ही सहमती व्यक्त केली आहे.

सर्व विकास प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर आणि त्यांच्यावर बारकाईने देखरेख ठेवण्याबाबतही मी आणि पंतप्रधान यांच्यात सहमती झाली आहे.

पंतप्रधान आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज आम्ही घेतलेले निर्णय आमच्या आर्थिक भागीदारीला बळ देतील आणि या संबंधाना एका नव्या उंचीवर नेतील.

महामहिम,

तुमचा हा दौरा अतिशय योग्य वेळी झाला आहे,

आमच्या आजच्या चर्चेमुळे आमच्यातील अनेक शतकांपासून असलेले संबंध आणखी मजबूत होतील आणि आमच्या भागीदाराचा एक नवा आणि वैभवशाली इतिहास लिहिला जाईल असा मला ठाम विश्वास आहे. पुन्हा एकदा मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतातील तुमचे वास्तव्य आनंददायी आणि फलदायी असेल अशी मी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद.