Sardar Patel's contribution for India is immense and invaluable, says PM Modi
Sardar Patel led the movement of independence with Gandhi ji & transformed it into a Jan Andolan: PM
All Indians want India to be a strong, prosperous nation. For this to happen the country must always stay united: PM

सर्वप्रथम तुम्ही सर्व माझ्याबरोबर घोषणा द्या,मी म्हणेन सरदार पटेल, तुम्ही म्हणा, अमर रहे, अमर रहे . सरदार पटेल, अमर रहे ,अमर रहे .

सरदार पटेल, अमर रहे , अमर रहे .

सरदार पटेल, अमर रहे , अमर रहे .

आज संपूर्ण देश सरदार साहेबांची जन्म जयंती साजरी करत आहे. आज जे भारतात आपण एका तिरंगी झेंड्याच्या खाली काश्मीर पासून कन्याकुमारी, अटक ते कटक, हिमालयापासून सागरापर्यंत जो एकसंध भारत पाहत आहोत , एका तिरंगी झेंड्याखालील भारत पाहत आहोत त्याचे सर्व श्रेय सरदार वल्लभ भाई पटेल यांना जाते. इंग्रजांनी देश सोडून जाताना असे षडयंत्र रचले होते की इंग्रज गेल्यानंतर लगेचच देशाचे ५०० हुन अधिक राज्यांमध्ये विभाजन होईल. छोटे छोटे तुकडे होतील. अनेक राजे रजवाडे, परस्परांमध्ये लढयांमध्ये नेस्तनाभूत होतील. देशात रक्तरंजित नद्या वाहतील, असे षडयंत्र जाता-जाता इंग्रजांनी रचले होते. मात्र ते लोहपुरुष सरदार पटेल होते , ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींची सावली बनून, लोकचळवळ जागवून, गांधींच्या प्रत्येक विचाराला लोकशक्ती प्रदान करण्याचा प्रयत्न केला होता. स्वातंत्र्याच्या चळवळीत इंग्रजांना दिवसा तारे दाखवण्याची हिंमत सरदार वल्लभ भाई पटेल यांनी दाखवली होती. त्याच सरदार साहेबानी स्वातंत्र्यानंतर लगेचच इंग्रजांचे मनसुबे भारताच्या मातीत गाडून टाकले, राजे-रजवाडे यांना एकत्र आणले आणि एकसंध भारत आज आपण सर्व जगत आहोत.

आपल्या देशात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हिमसागर रेल्वे चालते , सर्वात लांबचा प्रवास असलेली रेल्वेगाडी आहे. हिमालयाच्या कुशीतून निघते आणि कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत पोहोचते . जेव्हा आपण या रेल्वेतून प्रवास करतो , तेव्हा वाटेत अनेक राज्ये लागतात. मात्र आपल्याला ना कोणत्या राज्याचे परमिट घ्यावे लागते , ना कोणत्या राज्याचा व्हिसा घ्यावा लागतो, ना कुठल्या राज्याला कर द्यावा लागतो , एकदा काश्मीरमधून निघाले कि कन्याकुमारीपर्यंत विनासायास पोहोचतो. हे काम सरदार साहेबांमुळे झाले होते , त्यामुळे शक्य झाले होते.

बंधू भगिनींनो तुम्ही मला सांगा , भारत सामर्थ्यवान व्हायला हवा का व्हायला नको ? भारत अधिक मजबूत व्हायला हवा कि नको? भारताने जगभरात आपला डंका पिटवायला हवा कि नको? जगाने भारताचा स्वीकार करावा असा भारत व्हायला हवा कि नको ? बंधू भगिनींनो हे स्वप्न सव्वाशे कोटी भारतीयांचे आहे . इथे माझ्यासमोर एक प्रकारे छोटा भारत आहे , प्रत्येक भाषिक लोक माझ्यासमोर आहेत . प्रत्येकाचे स्वप्न आहे, भारत मजबूत व्हायला हवा , भारत सामर्थ्यवान बनायला हवा , भारत बलवान व्हायला हवा. भारत सामर्थ्यवान व्हायला हवा , भारत समृद्ध व्हायला हवा, मात्र बंधू भगिनींनो , हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिली अट आहे , भारतात एकी असायला हवी. धर्माच्या नावावर , जातीयवादाच्या विषावर , उच्च -नीच विकृत मानसिक प्रथा , श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी पाहता ,हा देश एकतेची अनुभूती करू शकत नाही.

आणि म्हणूनच , माझ्या प्रिय बंधू भगिनीनो , सरदार पटेल यांच्या जयंती दिनी एकतेचाच संदेश , ज्या महापुरुषाने आपल्या सामर्थ्याने ,आपल्या बौद्धिक कौशल्याने , आपल्या राजकीय इच्छाशक्तीने देशाला एक केले . प्रत्येक भारतीयाने देखील देशभक्तीच्या भावनेने भारताची एकता मजबूत बनवण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडली . देशाला तोडण्यासाठी , देशात फूट पाडण्यासाठी , देशात अंतर्गत विरोध जागृत करण्यासाठी , अनेक प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. अशा वेळी एकतेसाठी जागरूक प्रयत्न करणे आवश्यक असते, सतर्क राहणे आवश्यक असते. आपल्याला जोडून ठेवणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत, त्यांचे पुन्हा-पुन्हा स्मरण करणे गरजेचे असते. ही भारत माता , या भारतमातेच्या गळ्यात सव्वाशे कोटी भारतरूपी फुलांची माळ खुलून दिसत आहे. सव्वाशे कोटी देशबांधव फुलांच्या रूपाने या माळेशी बांधलेले आहेत, आणि या सव्वाशे कोटी फुलांना जोडणारा जो धागा आहे , तो धागा आहे आपली भारतीयत्वाची भावना. आपली भारतीयत्वाची भावना. या भारतीयत्वाच्या भावनेचा तो धागा सव्वाशे कोटी हृदयांना , सव्वाशे कोटी मस्तिष्कांना , सव्वाशे कोटी लोकसंख्येला , माता भारतीच्या माळेच्या रूपात ओवून ठेवतात आणि या सव्वाशे कोटी पुष्पांचा सुगंध , या सव्वाशे कोटी फुलांचा सुगंध, हा सुगंध आहे आपली देशभक्ती. हा देशभक्तीचा सुगंध आपल्याला क्षणोक्षणी ऊर्जा देतो, प्रेरणा देतो , चेतना देतो. त्याचे पुन्हा-पुन्हा स्मरण करून देशात एकता आणि अखंडतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपण संकल्पबद्ध व्हायला हवे.

माझ्या प्रिय तरुण सहकाऱ्यांनो , आज ३१ ऑक्टोबर , दिल्लीच्या धरतीला , देशाच्या जनतेला भारत सरकारकडून एक बहुमोल भेट मिळणार आहे. आता थोड्याच वेळात मी दिल्लीमध्ये सरदार साहेब यांच्या जीवनावर एका डिजिटल संग्रहालयाचे लोकार्पण करणार आहे. माझी तुम्हाला सर्वाना विंनंती आहे कि कमीत कमी दोन तास काढून , कमीत कमी , जास्तीत जास्त पूर्ण दिवस काढू शकता , आठवडा काढू शकता . एवढ्या गोष्टी तिथे पाहण्यासारख्या, समजून घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या आहेत. प्रगती मैदानाजवळच हे कायमस्वरूपी डिजिटल संग्रहालय तयार करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतर एवढी वर्षे उलटून गेल्यानंतर सुध्दा , सरदार साहेबच्या पश्चात आज इतक्या वर्षांनी दिल्लीत सरदार साहेबांना या रूपात सादर केले जाणार आहे. हे काम ४०, ५०, ६० वर्षांपूर्वी झाले असते तर , मात्र ठाऊक नाही , का नाही केले गेले . ना करणाऱ्यांचे उत्तर इतिहास मागेल. आम्हाला तर “काही केले” ही एक भावना बाळगून चालायचे होते.

सरदार साहेबांच्या एकतेच्या मंत्राला जीवनाचा सहज भाग बनवण्यासाठी , प्रत्येक भारतीयाचा सहज स्वभाव बनवण्यासाठी आज मी त्याच कार्यक्रमात एक नवीन योजना सुरु करणार आहे – “एक भारत , श्रेष्ठ भारत “. ही योजना देखील देशाच्या एकतेला बळ देणारी योजना असेल आणि त्या प्रदर्शनाच्या लोकार्पणाच्या वेळी आज मी तिचाही शुभारंभ करणार आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण देशात ही जी “रन फॉर युनिटी”’एकतेसाठी दौड ‘ ३१ ऑक्टोबरपासून पूर्ण आठवडाभर भारताच्या कानाकोपऱ्यांत आयोजित करण्यात आली आहे , मी देशवासियांना विनंती करतो कि आपण सरदार साहेबाचे कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. आपण सरदार साहेबांचा एकतेचा मंत्र कधी विसरता कामा नये . आपल्याला जसा भारत बनवायचा आहे तो भारत बनवण्यासाठी पहिली अट आहे देशाची एकता , जना -जनाची एकता , प्रत्येक मनाची एकता , प्रत्येक मनाचा एक संकल्प , आपली भारत माता महान बनावी , तो घेऊन पुढे जायचे आहे . मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना एवढ्या मोठ्या संख्येने , ते देखील दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही आल्याबद्दल, खरोखरच आनंद झाला आहे , खूप-खूप धन्यवाद .