पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दोन समित्या स्थापन करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. 149 सदस्यीय राष्ट्रीय समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान असतील, तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे 23 सदस्यीय कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी राहतील.
माजी पंतप्रधान अटलबिहार वाजपेयी, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रिकर हे केंद्रीय मंत्री, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा राष्ट्रीय समितीच्या सदस्यांमध्ये समावेश आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी कृषीमंत्री शरद पवार, खासदार शरद यादव, योगगुरु बाब रामदेव, गीतकार प्रसून जोशी, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचाही राष्ट्रीय समितीत समावेश करण्यात आला आहे. माजी सरन्यायाधीश आर.सी.लाहोटी, निवृत्त हवाईदल प्रमुख एस.कृष्णास्वामी, घटनातज्ञ सुभाष कश्यप, पर्यावरण तज्ञ सी.पी.भट्टही राष्ट्रीय समितीमधे आहेत.
याशिवाय, अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, पत्रकार, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक नेतेही या समितीमधे समाविष्ट आहेत. केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. महेश शर्मा हे या समितीचे संयोजक आहेत.