हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे आयोजित पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.
मुंबईवरच्या 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचं आणि पोलिसांनी त्याला दिलेल्या चोख प्रत्युत्तराचा यावेळी पंतप्रधानांनी उल्लेख केला. हौतात्म्य पत्करलेल्या 33हजार पोलीस जवानांचेही पंतप्रधानांनी स्मरण केले.
या वार्षिक परिषदेच्या आयोजनात झालेला बदल नमूद करत पंतप्रधान म्हणालेकी, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद एक उत्तम व्यासपीठ असून यामुळे धोरण नियोजनासाठी चांगल्या गोष्टी प्राप्त होतील.
मानसशास्त्र आणि वर्तणूक मानसशास्त्र हे प्रशिक्षणाचे मुख्य भाग असले पाहिजेत असे पंतप्रधान म्हणाले.
नेतृत्व कौशल्य महत्त्वपूर्ण असून पोलिसांमध्ये हे कौशल्य विकसित करणे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
कायदा आणि सुव्यवस्थेविषयी बोलताना पंतप्रधानांनी पोलीस विभागातील गस्त आणि गुप्तचर यंत्रणेवर भर दिला.
एकत्रित प्रशिक्षण प्रयत्नाच्या माध्यमातून पोलीस दलात गुणवत्तापूर्ण बदल झाला पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. पोलीस दलाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि मानवी प्रणाली या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन पोलीस ॲट युवर कॉल या मोबाईल ॲपचे पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना अद्वितीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने यावेळी सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील हुतात्मा स्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण केले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासमोर पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधानांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.