UAE is one of our most valued partners and a close friend in an important region of the world: PM
We regard UAE as an important partner in India’s growth story: PM Modi
UAE can benefit by linking with our growth in manufacturing and services: PM
Our energy partnership, is an important bridge in our linkages: PM at joint press statement with Crown Prince of Abu Dhabi
Security and defence cooperation have added growing new dimensions to India-UAE relationship: PM
India-UAE economic partnership can be a source of regional and global prosperity: PM

आदरणीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान,

अबूधाबीचे युवराज,

प्रसारमाध्यमातील मित्रहो,

प्रिय मित्र, आदरणीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आदरणीय महोदयांच्या या दुसऱ्या भारत भेटीमुळे आम्ही आनंदीत झालो आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन समारंभात आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचा सहभाग, हे या भेटीचे वैशिष्ट्य आहे. आदरणीय महोदय, ऑगस्ट 2015 मध्ये आणि गेल्या वर्षी ब्रुवारी मध्ये झालेल्या आपल्या भेटींच्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. आमच्या चर्चेमध्ये आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा झाली होती. आपली भागीदारी, आमच्या देशाबद्दल आपल्याला वाटणारे कौतुक आणि जगाबद्दलचा आपला दृष्टीकोन यामुळे मला व्यक्तिशः नितांत लाभ झाला आहे. आदरणीय महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आम्ही परस्पर संबंधांचा नवा समन्वय घडविण्यात यशस्वी झालो आहोत. आमची व्यापक भागीदारी हेतूपूर्ण आणि कृतीशील करण्यासाठी आम्ही परस्पर सहभागाचा महत्त्वाकांक्षी आराखडा साकार केला आहे. नुकतीच ज्या कराराची देवाणघेवाण झाली, त्याने या सामंजस्याला संस्थात्मक रूप दिले आहे.

मित्रहो,

युएई हा आमच्या सर्वात महत्त्वपूर्ण भागीदारांपैकी एक आहे आणि जगातील एक जवळचा मित्र आहे. मी आदरणीय महोदयांबरोबर नुकतीच अत्यंत फलदायक आणि उत्पादक चर्चा केली. विशेषतः आमच्या गेल्या दोन भेटींदरम्यान घेतलेल्या विविध निर्णयांवर अंमलबजावणी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. ऊर्जा आणि गुंतवणूकीसह महत्वाच्या क्षेत्रांतील आमच्या संबंधांची गती कायम राखण्याबाबत आमच्यात सहमती झाली.

मित्रहो,

आम्ही युएईला भारताच्या विकास गाथेतील एक महत्त्वाचा भागीदार मानतो. मी विशेषतः भारताच्या पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या युएई च्या स्वारस्याचे स्वागत करतो. आम्ही युएई मधील संस्थात्मक गुंतवणूकदारांना आमच्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीशी जोडण्यासाठी कार्यरत आहोत. दुबई मध्ये होणाऱ्या वर्ल्ड एक्स्पो 2020 च्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये भागीदार होण्यासाठी भारतीय कंपन्यांच्या स्वारस्याबद्दलही मी आदरणीय महोदयांशी चर्चा केली. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आमच्या सहकार्याने युएई स्वत:चा लाभ करून घेऊ शकेल. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था, मानवी भांडवल आणि स्मार्ट शहरीकरणासाठी आमच्या उपक्रमातील मुबलक संधींचा आम्ही संयुक्तपणे लाभ घेऊ शकतो. द्विपक्षीय व्यापारातील गुणवत्ता आणि प्रमाण वाढविण्यासाठी दोन्ही देशांच्या व्यवसाय आणि उद्योगांना आम्ही देखील प्रोत्साहन देत आहोत तसेच सुविधा उपलब्ध करून देत आहोत. आज स्वाक्षरी करण्यात आलेल्या व्यापार उपाययोजना करारामुळे आमची व्यापारसंबंधी भागीदारी मजबूत होईल. ऊर्जा क्षेत्रातील आमची भागीदारी हा आमच्या संबंधांमधला महत्वाचा दुवा आहे. तो आमच्या ऊर्जा सुरक्षेत योगदान देतो. विशिष्ट प्रकल्प आणि प्रस्तावांच्या माध्यमातून आमच्या ऊर्जा क्षेत्रातील संबंधांना धोरणात्मक दिशा देण्याच्या मार्गांबाबत आदरणीय महोदयांनी आणि मी चर्चा केली.  या संदर्भात ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन पुरवठा करार आणि संयुक्त उपक्रमांची स्थापना करणे, हा फायदेशीर मार्ग असू शकतो.

मित्रहो,

सुरक्षा आणि संरक्षणविषयक सहकार्याने आमच्या नातेसंबंधांना एक नवा आयाम प्रदान केला आहे. आम्ही संरक्षण क्षेत्रासह सागरी सुरक्षेच्या नव्या क्षेत्रात आमच्या उपयुक्त सहकार्याचा विस्तार करण्याचे मान्य केले आहे. आजच्या दिवशी स्वाक्षरी केलेल्या संरक्षण सहकार्यविषयक सामंजस्य करारामुळे आमच्या संरक्षण संबंधी उपक्रमांना योग्य दिशा मिळेल. हिंसाचार आणि अतिरेकीवादाचा मुकाबला करण्याच्या  दृष्टीने आमचे वाढते सहकार्य आमच्या जनतेला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.

मित्रहो,

केवळ आम्हा दोघांच्याच देशांच्या दृष्टीने आमचे नजीकचे संबंध महत्वाचे आहेत असे नाही, तर संपूर्ण शेजारी राष्ट्राच्या दृष्टीनेही ते महत्वाचे आहेत, असा विश्वास मला आणि आदरणीय महोदयांना वाटतो. आम्ही एकत्र येण्याने या क्षेत्राला स्थैर्य लाभू शकते. आमची आर्थिक भागिदारीही प्रादेशिक आणि जागतिक समृद्धीचा स्रोत ठरू शकते. पश्चिम आशिया तसेच आखातातील विकासासंदर्भातील मतांची आम्ही देवाण घेवाण केली, जेथील शांतता आणि स्थैर्य हे आम्हा दोन्ही देशांच्या स्वारस्याचे विषय आहेत. आम्ही अफगाणिस्तानसह आमच्या क्षेत्रातील विकासाचीही चर्चा केली. पुरोगामी विचारसरणी आणि दहशतवाद यापासून आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला असलेल्या  वाढत्या धोक्याबाबत आम्हाला चिंता असून त्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करत आहोत.

मित्रहो,

युएई मध्ये सुमारे 2.6 दशलक्ष भारतीय राहतात. भारत आणि युएई दोन्ही देशांसाठी त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. युएई मधील भारतीयांच्या कल्याणाकडे लक्ष दिल्याबद्दल मी आदरणीय महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. भारतीय वंशाच्या लोकांसाठी अबुधाबी येथे मंदिर बांधण्यास जागा मंजूर केल्याबद्दलही मी आदरणीय मान्यवरांचे आभार मानतो.

मित्रहो,

आमच्या यशस्वी भागिदारीचे श्रेय युएई चे राष्ट्राध्यक्ष महामहिम शेख खलिफा बिन झायेद अल् नह्यान आणि महामहिम शेख मोहम्मद यांच्या वैयक्तीक स्वारस्यालाही आहे. या पुढेही मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने आमचे सहकार्य सज्ज राहील. माननीय महोदय, आपल्या या भेटीमुळे आपल्या यापूर्वीच्या संवाद प्रक्रियेला  अधिक गती मिळेल, तसेच भविष्यात आपल्या भागिदारीला सखोलता, ध्येयासक्ती आणि वैविध्य प्राप्त होईल, असा विश्वास मला वाटतो. सरतेशेवटी, आदरणीय महोदयांनी भारताला भेट देण्याचे माझे आमंत्रण स्वीकारले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांचा भारत दौरा  आनंददायी राहो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

धन्यवाद, मनापासून धन्यवाद.