अखिल जम्मू आणि काश्मीर पंचायत परिषदेच्या 30 सदस्यीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 7 लोक कल्याण मार्ग इथे भेट घेतली.
जम्मू काश्मीरशी संबंधित विकासाच्या बाबींबद्दल या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना माहिती दिली. अखिल जम्मू आणि काश्मीर पंचायत परिषद ही जम्मू काश्मीरमधल्या पंचायत नेत्यांची सर्वोच्च संस्था आहे. यामधे राज्यातल्या 4000 खेड्यातल्या पंचायती असून 4000 सरपंच आणि 29000 पंचाचा समावेश आहे. अखिल जम्मू आणि काश्मीर पंचायत परिषदेचे अध्यक्ष शफिक मीर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
पंचायतींचे सबलीकरण झाले नसल्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदतीचे लाभ खेडयांपर्यंत पोहोचत नसल्याचे या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी एक निवेदनही पंतप्रधानांना सादर केले.राज्यातल्या पंचायत आणि नागरी स्थानिक संस्थाच्या निवडणूका लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांचा भरघोस प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
घटनात्मक तरतुदीला मुदतवाढ दिल्याने पंचायतींना ग्रामीण भागात विकासकामे हाती घ्यायला मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे राज्यात विकास प्रक्रियेला गती मिळेल तसेच केंद्रसरकारच्या विविध योजनांचा लाभ जनतेला घेता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या शिष्टमंडळाने देशाच्या लोकशाही संस्थां आणि प्रक्रियेवरच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला. मोठ्या प्रमाणातल्या जनतेला राज्यात शांततामय जीवन हवे असल्याचे मीर यांनी सांगितले.
राज्यातल्या सद्य स्थितीबद्दल शिष्टमंडळाने पंतप्रधानांना माहिती दिली. असामाजिक तत्वांकडून शाळा जाळण्याच्या घटनेचा शिष्टमंडळाने तीव्र निषेध केला.
राज्यात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंतप्रधानांनी वैयक्तिक पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळाच्या मागण्यात केंद्र सरकार लक्ष घालेल असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.जम्मू काश्मीरच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या संख्येने जनता खेड्यात राहत असून राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी, खेड्यांचा विकास महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी दृष्टीकोनावर भर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. जम्मू काश्मीरच्या विकास प्रक्रियेत, विकास आणि विश्वास हे केंद्र सरकारचे महत्वाचे आधारस्तंभ राहतील असे पंतप्रधान म्हणाले.