अतिशय उत्कृष्ट अंदाजपत्रक सादर केल्याबद्दल मी वित्तमंत्री अरुण जेटलीजी यांचे अभिनंदन करतो. गरिबांना सक्षम बनविणारा आणि समाजातील सर्व घटकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे. यामुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी उत्तेजन मिळणार आहे, त्याचबरोबर विकासाला चालना देतानाच आर्थिक प्रणालीला अधिक बळकटी आणणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आली आहे. अगदी रस्ते बांधणीपासून ते लोहमार्गाच्या विस्तारीकरणापर्यंत, डाळींच्या किंमतींपासून ते ‘डाटा‘च्या गतीपर्यंत, रेल्वेच्या आधुनिकीकरणापासून ते साध्या परवडणा-या बांधकामापर्यंत, शिक्षणापासून ते आरोग्यसेवांपर्यंत, व्यावसायिकापासून ते उद्योगापर्यंत, वस्त्रनिर्मात्यापासून ते कर वजावटीपर्यंत सर्व क्षेत्रांचा यामध्ये विचार केला गेला आहे. आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प ‘ऐतिहासिक’ असून त्यासाठी वित्तमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी अभिनंदनास पात्र आहेत.

गेल्या अडीच वर्षात सरकारने विकासासाठी जी पावले उचलली; त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये पडले आहे आणि सरकार या योजना पुढे कशा पद्धतीने राबवणार आहे, त्याचे दिशानिर्देशही त्यातून मिळत आहेत. रेल्वे अंदाजपत्रकाचाही या केंद्रीय अर्थसंकल्पात समावेश करून सरकारने एक महत्वपूर्ण पाउूल उचलले आहे. यामुळे वाहतूक क्षेत्रासाठी एकत्रित योजना तयार करण्यासाठी मदत होउू शकेल. देशाची वाहतुकीची गरज आता रेल्वेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पूर्ण होण्यासाठी आता मोठी मदत मिळणार आहे.

या अंदाजपत्रकामध्ये कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी गुंतवणूक वृद्धी होणे आवश्यक आहे, त्यासाठी सरकारची कटिबद्धता लक्षात घेवून अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनांसाठी आवश्यक असणा-या निधीमध्ये पुरेशा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रेल मार्ग आणि रस्ते वाहतूक क्षेत्रासाठी निधीमध्ये भरपूर वाढ केली आहे. सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असे उदिद्ष्ट सरकारने निश्चित केले आहे; या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी सरकारने नवीन योजना तयार केल्या आहेत. या अंदाजपत्रकामध्ये शेतकरी, गावे, गरीब, दलित आणि समाजातील अविकसित गटाचे कल्याण कसे होईल, याला प्राधान्य दिले आहे. कृषी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पाणलोट विकास, स्वच्छ भारत अभियान या क्षेत्रामध्ये खूप मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाच्या संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्रातील कार्यामुळे ग्रामीण भारताचे चित्रच पालटून जाणार आहे, त्यांचे आयुष्य बदलून जाणार आहे.

रोजगाराच्या संधी कशा वाढू शकतील, यावर प्रस्तूत अंदाजपत्रकामध्ये भर देण्यात आला आहे. इलेक्टॉनिक उत्पादने, वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रांना विशेष निधी दिला आहे. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होउू शकणार आहेत. असंघटित क्षेत्रामध्ये काम करणा-यांना संघटित क्षेत्रात आणण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. आपल्या देशातील युवावर्गाची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकसनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. देशाच्या भौगोलिक रचनेचा फायदाही भारताला मिळावा, याचा प्रमुख विचारही केला गेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेअंतर्गत यंदा विक्रमी निधी वितरित करण्यात आला. इतका निधी आत्तापर्यंत कधीच वितरित करण्यात आला नाही. आमच्या सरकारच्या दृष्टीने “महिला कल्याण” या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे महिला आणि बालक कल्याण यांच्याशी संबंधित योजनांसाठी अंदाजपत्रकामध्ये निधी वाढवण्यात आला आहे. महिला आरोग्य आणि उच्च शिक्षणासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरपूर, पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होण्यासाठी गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्र फार महत्वाची भूमिका बजावत असतात. ग्रामीण भागाबरोबरच शहरी, नागरी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला बळकटी प्रदान करण्याचे काम या अंदाजपत्रकामुळे होणार आहे.

रेल्वे अंदाजपत्रकामध्ये रेल्वे सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र ‘ रेल्वे सुरक्षा निधी’ तयार करण्याचा प्रस्ताव असून या निधीव्दारे रेल्वे सुरक्षेसाठी पुरेसा निधी उपलब्ध होउू शकणार आहे. या अंदाजपत्रकामध्ये रेल्वे, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांसाठी भांडवली खर्चामध्ये मोठयाप्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी जो सर्वंकष निधी दिला आहे, त्यामुळे करचोरी- करचुकवेगिरी आता शक्य होणार नाही आणि अर्थ व्यवस्थेमध्ये काळा पैसा चलनात येण्यावरही नियंत्रण येवू शकणार आहे. ‘डिजिटल अर्थ व्यवस्था’ कार्यान्वित करण्याचे अभियान सुरू केल्यामुळे आगामी 2017-18 या वर्षात अडीच हजार कोटी डिजिटल व्यवहार करण्याचे लक्ष्य गाठणे शक्य होणार आहे.

वित्तमंत्री जेटली यांनी करप्रणालीमध्ये जी सुधारणा आणि दुरूस्ती सुचवली आहे, त्यामुळे मध्यमवर्गाला मोठाच दिलासा मिळणार आहे. याचा परिणाम म्हणजे उद्योगांची स्थापना होउू शकेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, भेदभाव संपुष्टात येवून खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. व्यक्तिगत प्राप्तीकरामध्ये दिलेली सवलत, हा मुद्दा मध्यमवर्गाला स्पर्श करणारा, भावणारा आहे. सध्याचा प्राप्तीकर दर 10 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करणे हा निर्णय धाडसी म्हणावा लागेल. या निर्णयाचा देशातील बहुतांश करदात्यांना लाभ होणार आहे. काळापैसा आणि भ्रष्टाचार यांच्याविरोधात मी सुरू केलेली लढाई आपल्याला माहीत आहेच. राजकीय पक्षांना दिला जाणारा निधी याची चर्चा आपल्या देशात सातत्याने होत असते. राजकीय पक्षांच्या भोवती या चर्चेची सुत्रे फिरत असतात. आजच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राजकीय पक्षांना कशा पद्धतीने देणग्या देता येतील, याची एक योजनाच स्पष्ट केली आहे. आमच्या सरकारच्या काळ्या पैशाच्या लढाईला अनुसरून ही योजना त्यांनी जाहीर केली आहे.  

देशातले लघू आणि मध्यम उद्योग म्हणजे रोजगार निर्मितीचे मोठे स्रोत असतात. मात्र या उद्योग व्यवसायांना जागतिक स्तरावरच्या स्पर्धेमध्ये टिकून राहणे अवघड असते. त्यासाठी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कर थोडे कमी केले तर आपल्या देशातल्या जवळपास 90 टक्के लघू उद्योगांना लाभ होणार आहे. त्यांची ही दीर्घकालीन मागणी लक्षात घेवून सरकारने ‘लघू उद्योग व्यवसायाची व्याख्या बदलून आता त्यांची व्याप्ती वाढवली आहे. आणि कर 30 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळे देशातले उद्योग जगतातले 90 टक्के लोक याचा फायदा घेवू शकणार आहेत. या निर्णयामुळे देशातल्या लहान उद्योगांना जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मदत मिळेल, असा मला विश्वास वाटतो.

देशाची वाटचाल एकूणच प्रगतीच्या, विकासाच्या दिशेने व्हावी, यासाठी अतिशय महत्वपूर्ण पावूल या अंदाजपत्रकामुळे उचलेले जाणार आहे. या अंदाजपत्रकामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, संपूर्ण आर्थिक विकास होण्यासाठी मदत मिळेल, शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी पूरक ठरेल. नागरिकांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्‍टीने शिक्षण, आरोग्य, घरकूल, या सगळ्याबाबतीत खूप चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता वाढणार आहे. आणि वित्तीय तूट न वाढवता देशातल्या मध्यम वर्गाची क्रयशक्ती वाढणार आहे, तसेच त्याच्या खिशातही भरपूर पैसे येणार आहेत.

आपला देश खूप वेगाने बदलतोय, त्याचेच प्रतिबिंब या अंदाजपत्रकामध्‍्ये पडले आहे, असे एका अर्थाने म्हणावे लागेल. हे अंदाजपत्रक आपल्या स्वप्नांशी जोडले गेले आहे. आपल्या संकल्पांशी जोडले गेले आहे, आणि त्यादिशेने टाकलेले पावूल म्हणजेच हे अंदाजप़त्रक आहे. याचा अर्थ एक प्रकारे ते आपले ‘भविष्य’ आहे, असे मी मानतो. आपल्या नवीन पिढीचे भविष्य आहे. आपल्या शेतक-याचे भविष्य आहे. आणि ज्यावेळी मी ‘फ्यूचर’, भविष्‍य असे म्हणतो, त्यावेळी माझ्या मनात त्याचा एक वेगळा अर्थ आहे. एफ म्हणजे फार्मर- शेतकरी, यू म्हणजे अंडरप्रिव्हिलेज- दलित, पीडित, शोषित, वंचित, महिला; टी म्हणजे ट्रान्सपरन्सी- पारदर्शकता, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, आधुनिक भारत बनविण्याचे स्वप्न, यू म्हणजे अर्बन रिज्युविनेशन-शहरी विकासासाठी, आणि आर म्हणजे रूरल डेव्हलपमेंट- ग्रामीण विकास, ई म्हणजे नवयुवकांसाठी एम्प्लॉयमेंट- रोजगार, उद्योग काढण्याचे धाडस दाखविणा-यांसाठी नवे व्यवसाय, रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या अंदाजपत्रकामध्ये ‘फ्यूचर-भविष्य’ प्रस्तूत केल्याबद्दल वित्तमंत्र्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि देशावासियांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी एक मार्ग दाखवणा-या या अंदाजपत्रकाचा खूप लाभ होणार आहे, असा विश्वास व्यक्त करतो, हे अंदाजपत्रक देशालाही पुढे घेवून जाणारे आहे. विकासाची नवी उंची पार करण्‍्यासाठी आणि देशामध्ये एक नवे विश्वासाचे वातावरण तयार होण्यासाठी हा अर्थसंकल्प उपकारक ठरेल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा वित्तमंत्री आणि वित्त मंत्रालयाच्या त्यांच्या टीमचे ह्दयापासून, मनापासून खूप- खूप अभिनंदन करतो.