राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थांचं पावित्र्य कायम राखायला पाहिजे. “माझ्या पक्षावर, सरकारवर किंवा माझ्यावर चढवण्यात येणारे हल्ले मी समजू शकतो पण RBI सारख्या संस्थांना राजकारणात खेचायला नको. त्यांचं पावित्र्य कायम ठेवलं पाहिजे,” असं मत श्री मोदी यांनी व्यक्त केलं. पंतप्रधान म्हणाले की RBI ची आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका आहे आणि आपण त्याप्रती सकारात्मक योगदान द्यायला पाहिजे.

श्री मोदी म्हणाले की रालोआ सरकारने RBI सारख्या संस्थांना आणखी सशक्त करण्यासाठी काही उपाय योजले आहेत. “ आम्ही RBI च्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि एक आर्थिक धोरण समिती स्थापन केली. हे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित होतं, आमच्या सरकारने ते केलं. या समितीमधला एकही सदस्य केंद्र सरकारमध्ये नाही”.