अतिशय अवघड काम अंगी घेणारे आणि त्यांच्या संघातील सहका-यांच्या क्षमतेच्या परिसीमेपर्यंत त्यांना काम करायला लावणारे आणि त्यानंतर त्यापेक्षाही जास्त क्षमतेची कामगिरी करायला प्रोत्साहित करायला लावणारे व्यक्तिमत्व अशी नरेंद्र मोदी यांची ओळख निर्माण झाली आहे. मग अशा वेळी जर त्यांचे संघसहकारी अपयशी ठरले तर मोदी यांचा संयम कधीतरी सुटतो का? मोदी निष्ठुर आहेत का?

31 ऑगस्ट 2012 रोजी निर्माण झालेली परिस्थिती आणि तिची झालेली हाताळणी हे मोदी अशा परिस्थितीची हाताळणी कशी करतात याचे उत्तम उदाहरण आहे. त्यावेळी पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नेत्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुगलवरुन होणार होते. या कार्यक्रमाबाबत जगभरातून लोकांमध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली की असंख्य लोकांच्या प्रतिसादामुळे या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाच्या वेळीच गुगलचे सर्व्हर क्रॅश झाले आणि कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर 45 मिनिटांच्या विलंबाने सुरू झाले. हे प्रक्षेपण संपल्यानंतर गुगल इंटरनॅशनलच्या टीमला मोदींच्या कार्यालयामध्ये शिष्टाचारानुसार अनौपचारिक गप्पांसाठी आमंत्रित करण्यात आले. परिपूर्णतेबद्दल असलेल्या त्यांच्या लौकिकामुळे आणि अशा परिस्थितींमध्ये भारतीय राजकारण्यांबाबत असलेल्या सर्वसामान्य दृष्टिकोनामुळे आपल्याला बोलणी खावी लागणार अशी भीती या टीमच्या मनात निर्माण झाली होती. मात्र त्यांना वेगळाच अनुभव आला आणि ते चकित झाले. मोदी यांनी त्यांचे सुहास्य मुद्रेने स्वागत केले आणि त्यांच्या भावी काळातील योजना आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणत्या प्रकारच्या तांत्रिक सुधारणा आवश्यक असतील याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.

हा केवळ एकच किस्सा नाही, मोदी यांचा हा स्वभाव, एक अशी व्यक्ती की जी कधीही सहनशक्तीचा अंत करणा-या स्थितीतही आपले भान सोडत नाही हा त्यांचा लौकिक ज्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे त्यांनीही मान्य केला आहे. ते कधीच निष्ठुर किंवा उद्धट होत नाहीत. एखादी व्यक्ती किंवा त्यांचा एक संपूर्ण संघ जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा ते त्यांना त्या अपयशातून मिळालेल्या शिकण्याच्या संधीचा उपयोग करण्याचा आणि तपशीलवार योजना तयार करून पुढील प्रयत्नांसाठी त्यांचा वापर करण्याचा सल्ला देतात. जोपर्यंत काहीतरी शिकण्याची तुमची तयारी असेल, तोपर्यंत मोदी नेहमीच तुमच्या पाठिशी असतील.