देशाला कचरामुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मोहिमेने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे.
15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ला येथे आयोजित समारंभात स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी आवाहन केले. त्याचवर्षी 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांनी स्वत: केरसुणी उचलून स्वच्छ भारत मोहिमेत सक्रीयता दर्शवली. त्यांनी वारंवार स्वच्छतेबाबत सार्वजनिक आवाहन केले. कार्यक्रम अधिकृत असो अथवा राजकीय, प्रत्येक वेळी त्यांनी स्वच्छतेबाबत आग्रह धरला.
या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारत योजनेला पाठींबा दर्शवला यात आश्चर्य नाही. प्रसार माध्यमांनी या चळवळीला पाठींबा दिला.
चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उदाहरणांमधून स्वच्छ भारत मोहिम आणि पंतप्रधानांच्या शब्दांनी देशाला कशाप्रकारे प्रभावित केले आहे, ते दिसून येते.
चंद्रकांत कुलकर्णी हे मध्यमवर्गीय कुटुंबामधले सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असून, त्यांना दरमहा सोळा हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन प्राप्त होते. स्वच्छ भारत मोहिमेतून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी या कामी दरमहा पाच हजार रुपये देण्याचे ठरवले. इतकेच नाही तर त्यांनी पुढच्या महिन्यांतील योग्य तारखा असलेले 52 मुदतपूर्व धनादेशही तयार ठेवले.
एका सेवानिवृत्त व्यक्तीने स्वच्छ भारतासाठी आपल्या उत्पन्नातील जवळजवळ एक तृतीयांश भाग प्रदान केला. पंतप्रधानांच्या शब्दांमुळे लोकांच्या मनावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे, आणि देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यात नागरिकांचा एकात्म सहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, हे जाणून घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या मनोवृत्तीचे हे बोलके उदाहरण आहे. स्वच्छ भारत घडवण्यासाठी कशाप्रकारे लोक एकत्र येत आहे, याबाबत पंतप्रधानांनी स्वत: अनेक किस्से सांगितले. मन की बात या त्यांच्या उपक्रमातील प्रत्येक भागात स्वच्छतेबाबतच्या किमान एका प्रसंगाचा समावेश असतो.
देशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्क असणाऱ्या स्वच्छतेसाठी एक व्यापक चळवळ उभारण्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निश्चितच यशस्वी ठरले आहेत.